आपण मुंबईत येणार असून आपल्याला रोखण्याचा कोणाच्या बापामध्ये हिंमत आहे असं म्हणणाऱ्या कंगाना रणौतला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं आहे. ट्विटवरुन कंगनावर निशाणा साधत रुपाली यांनी कंगनाला दिसणारी मुंबई ही मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे असं म्हटलं आहे. तसेच मुंबई कोणाच्या बापाची आहे हे आम्ही दाखवलं असतं मात्र कंगनासारख्या कृतघ्न लोकांसाठी आमच्याकडे वेळ नाही असा टोलाही रुपाली यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. यानंतर सोशल मीडियावर सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांनी कंगनावर टीका केली आहे. सोशल मीडियावर कंगना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान कंगनाने अजून एक ट्विट केलं असून मुंबईत येऊ नकोस असं धमकावणाऱ्यांना थेट आव्हान दिलं आहे. ‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा,’ असं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कंगनाच्या या आव्हानाला रुपाली यांनी उत्तर दिलं आहे. “मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन, कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वाया घालवत नाही. कंगना रणौत तू उतरलेल्या विमानतळापासून ते तुझ्या घरापर्यंत जी मुंबई पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे,” असा टोला रुपाली यांनी लगावला आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये रुपाली यांनी, “शुटींगच्या सेटपासून ते चित्रपटगृहांपर्यंत जी सुरक्षितता आहे ती मुंबई पोलिसांमुळेच आहे.सध्या काही काम नसल्यामुळे फुटकळ प्रसिद्धीसाठी अशी बालिश बडबड करताना स्वतःच्या तोंडाला लगाम घाल. मुंबई पोलीस देशाचा अभिमान आहेत,” असं म्हणत कंगनावर टीका केली आहे.

मुंबई पोलिसांबद्दल काय म्हणाली होती कंगना?

सुशांत सिंह प्रकरणामध्ये अंमली पदार्थांसंदर्भातील खुलासा समोर आल्यानंतर भाजपाचे आमदार राम कदम यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये कदम यांनी कंगणाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती. “बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत बॉलिवुडमधील ड्रग्ज माफियांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे. पण, त्यासाठी तिला सुरक्षा देणं गरजेचं आहे. दुर्देवं म्हणजे १०० तास, ४ दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्र सरकारने अजून कंगनाला सुरक्षा पुरवलेलेली नाही”, असं ट्विट करत राम कदम यांनी कंगनाला सुरक्षेची मागणी केली होती.

त्यानंतर कंगनाने “सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचे ट्विट केले.

कंगनाच्या प्रतिक्रियेनंतर त्यावर राम कदम यांनी पुन्हा रिप्लाय देताना एक व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. “अभिनेत्री कंगना रणौतचं, मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते हे विधान महाराष्ट्र सरकारसाठी खणखणीत चपराक आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हस्तक्षेप करुन महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांच्या सक्षम प्रतिमेला मलीन केलं” असं राम कदम म्हणाले होते.

राऊतांनी दिलं उत्तर

कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. मुंबईची भीती वाटत असेल तर कंगनाने परत येऊ नये अशी टीका राऊत यांनी केली होती. या वक्तव्यावरुन राऊत यांच्यावर टीका करताना कंगानाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली.

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि मी पुन्हा मुंबईत परत येऊ नये असं म्हटलं. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता तर मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. ही मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?,” असे ट्विट कंगानाने केलं होतं.