केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यांच्या या आंदोलनाला इतर सेलिब्रिटींसोबतच प्रसिद्ध गायिका रूपिंदर हांडा हिने देखील पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांचं हे आंदोलन पाहून ती भावूक झाली आहे.

रूपिंदरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शेतकऱ्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहे. “किसान एकता झिंदाबाद. शेतकऱ्यांचं हे आंदोलन पाहून मी भावूक झाले आहे. या ठिकाणी ७०-८० वर्षांचे आजी-आजोबा देखील उपस्थित आहेत. त्यांच्या उत्साहाला, संघर्षाला सलाम. अशा धाडसी समाजात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे.” अशा आशयाचं भाषण करत रूपिंदरनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रोत्साहन दिलं. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

शेतकरी बुराडी मैदानावर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्तावही त्यांनी नाकारला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या तीसहून अधिक शेतकरी गटांची बैठक रविवारी झाली. बुराडी मैदान हा ‘खुला तुरुंग’ असल्यामुळे आपण तेथे जाणार नाही, असे आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीनंतर सांगितले. शेतकरी कुठल्याही अटींवर चर्चेला तयार नसल्याचेही ते म्हणाले.