युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग हादरले आहे. युद्धग्रस्त युक्रेनसह रशियामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहे. त्या विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने या सर्वांना भारतात परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. करोना काळात गरिबांसाठी ‘मसिहॉं’ ठरलेला अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आला आहे. नुकतंच युक्रेनमधून सुखरूप परतलेल्या एका विद्यार्थ्याने त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती सांगितली. तसेच सोनू सूदच्या टीमने त्याला कशी मदत केली, याचीही त्याने माहिती दिली.
सोनू सूदने नुकतंच त्या मुलाचा संपूर्ण व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लक्ष्मण नावाचा एक विद्यार्थी घडलेला सर्व प्रसंग सांगताना दिसत आहे. यावेळी लक्ष्मण म्हणाला, “मला गेल्या १५ दिवसात आज आराम मिळाला आहे आणि मी आता मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्याचे दिसत आहे. मी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे आणि हे सर्वात सुरक्षित होते. काही दिवसांपूर्वी आम्हाला दूतावासाकडून १५ दिवसांच्या युद्धाच्या स्थितीबद्दल नोटीस मिळाली. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि तुम्हाला सुरक्षित वाटत असेल तर तुम्ही इथे थांबू शकता.




त्यावेळी प्रत्येकजण म्हणत होता की आपण थोडे सुरक्षित आहोत. तर विद्यापीठ म्हणत होते की हे युद्ध ८ वर्षांपासून सुरु आहे. पण त्यासाठी विद्यापीठ बंद करणार नाही. ते तसेच सुरु असेल आणि युक्रेनमध्ये असा नियम आहे की जर तुम्ही तीन दिवस गैरहजर असाल तर ते तुम्हाला काढून टाकतात. त्यामुळे त्यावेळी मी घाबरून बाहेर आलो नाही. पण त्यानंतर दूतावासाने सांगितले की, तुम्ही जिथून आला आहात, तिथे निघून जा. मी बाहेर गेलो. फार रात्र झाली होती. मला बसने २० मिनिटात पोलँड बॉर्डरवर सोडले.
मोठ्या कष्टाने आम्हाला थंडीत राहण्यासाठी जागा सापडली. आम्ही सकाळी लवकर निघालो आणि त्यावेळी माझ्या मित्राने एक व्हिडीओ पाठवला. त्यात त्याने सांगितले की तिकडे जाऊ नकोस. तेथे सतत मारामारी होत आहे. मुलांना वाईट वागणूक दिली जात आहे. त्यामुळे मग मी तिथे न जाता परत माघारी आलो. यानंतर मी सोनू सूदच्या टीमशी संपर्क साधला. त्यांच्या टीमने मला मार्गदर्शन केले आणि कोणती सीमा सर्वात सुरक्षित आहे, याचीही माहिती दिली. पण दुसरीकडे दूतावासाने त्या सीमेचा उल्लेखच केला नव्हता. मी रात्री १२ वाजता बाहेर पडलो. बॅगमधून तिरंगा काढला. तिरंगा पाहून मला कोणीही अडवले नाही. विशेष म्हणजे आम्हाला सीमेवर जेवणही दिले. त्यानंतर मी तिथून सुखरूप बाहेर पडू शकलो, असे त्या विद्यार्थ्याने सांगितले.
या सर्व प्रकारानंतर सोनू सूदने अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याल कॅप्शन देताना तो म्हणाला, “भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या आपच्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप कठीण काळ आहे आणि कदाचित माझी आतापर्यंतची सर्वात कठीण असाईनमेंट आहे. पण सुदैवाने तिथे अडकलेले अनेक विद्यार्थी हे सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाणी जात आहे. पण चला प्रयत्न करत राहू. त्यांना आपली गरज आहे. दरम्यान सोनू सूदने या पोस्टद्वारे भारत सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारतीय दूतावास यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांच्या सतत सहकार्यासाठी त्यांचे आभार.”
चित्रपट समीक्षक जय प्रकाश चौकसे यांचे निधन, अखेरच्या लेखातील ‘ते’ वाक्य चर्चेत
दरम्यानय युक्रेनच्या खार्कीव्ह आणि अन्य युद्धग्रस्त शहरांतून भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्याबाबत रशिया आणि युक्रेनच्या दूतावासाबरोबरच उभय देशांतील भारतीय दूतावासांशी संपर्कात आहेत. युद्धग्रस्त भागांतून भारतीयांना सुरक्षित बाहेर पडू देण्याबाबत २४ फेब्रुवारीपासून या दोन्ही देशांकडे वारंवार मागणी करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे हंगेरी, ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानिया, किरेन रिजीजू हे स्लोव्हाकीया आणि जनरल व्ही़ क़े सिंह यांना पोलंडमध्ये पाठविण्यात आले आहे.