करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपट उद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. निर्मात्यांना कोट्यवधींचे नुकसान होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अमेरिकन प्रशासनाने सिनेमागृह पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु यामुळे चित्रपट उद्योगाला फारसा फायदा होणार नाही अशी भीती रुसो ब्रदर्स यांनी व्यक्त केली आहे.

फॉक्स ५ला दिलेल्या मुलाखतीत ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’चे दिग्दर्शक रुसो ब्रदर्स यांनी काही धक्कादायक खुलासे केले. ते म्हणाले, “अमेरिकेतील परिस्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. करोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. अशा स्थितीत सिनेमागृह सुरु करणं धोकादायक ठरु शकते. शिवाय किती प्रेक्षक जीवावर उदार होऊन चित्रपट पाहायला येतील याबाबत आमच्या मनात शंका आहे. कारण एकीकडे सरकार नागरिकांना घरातच बसायला सांगतेय तर दुसरीकडे सिनेमागृह सुरु करुन त्यांना चित्रपट पाहायला पाठवतेय. यामुळे नागरिक आणखी गोंधळतील.” अशी भीती रुसो ब्रदर्स यांनी व्यक्त केली.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत तब्बल १८ हजार ६५३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ५०७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचली आहे. एकूण करोनाबाधितांमध्ये २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ३ लाख ४७ हजार ९७९ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत करोनामुळे देशभरात १७ हजार ४०० जणांना जीव गमावावा लागलेला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.