सुपरस्टार प्रभास व श्रद्धा कपूर यांच्या दमदार अ‍ॅक्शन सीन्सने भरलेला ‘साहो’ सध्या तिकीटबारीर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या चारच दिवसात ‘साहो’ने १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला. यावरुनच या चित्रपटाची लोकप्रियता आपल्याला लक्षात येते. परंतु समिक्षकांनी मात्र मिश्र प्रतिसाद देत केवळ प्रभासवेडातूनच या चित्रपटाला प्रसिद्धी मिळत असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. दरम्यान एका फ्रेंच दिग्दर्शकाने साहोला फ्रिमेक म्हणत त्यावर चक्क पटकथा चोरीचा आरोप केला आहे.

या दिग्दर्शकाचे नाव जेरोम साल असे आहे. त्याच्या लार्गो विंच या फ्रेंचपटावरुन साहोची निर्मिती करण्यात आल्याचे आरोप त्याने केले आहेत. २००८ साली प्रदर्शित झालेला लार्गो विंच हा एक अ‍ॅक्शनपट होता. आश्चर्याची बाब म्हणजे साहोची पटकथा व त्यातील अ‍ॅक्शन सीन्स अगदी हुबेहुब या फ्रेंच चित्रपटाशी मिळते जुळते आहेत. असे एक ट्विट काही दिवसांपूर्वी केले गेले होते. याच ट्विटला रिट्विट करत दिग्दर्शक जेरोम याने साहोची खिल्ली उडवली आहे. “लार्गो विंचची नक्कल करायचीच होती, तर त्यांनी ती व्यवस्थीत करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी हास्यास्पद पद्धतीने हा चित्रपट तयार केला आहे. नक्कल करायलाही अक्कल लागते परंतु भारतीय दिग्दर्शकांकडे बहुदा ती नसावी.” अशा शब्दात त्याने साहोवर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी अशीच काहीशी टीका अभिनेत्री लिसा रे हिने देखील केली होती. तिने साहोचे पोस्टर ट्विट करुन हा चित्रपट लार्गो विंचची नक्कल असल्याचे म्हटले होते.