‘सांड की आँख’ या चित्रपटाच्या निर्मात्या निधी परमार हिरानंदानी ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. नुकतंच ती तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. यात तिने १०० लिटर ब्रेस्ट मिल्क दान करण्याबाबतचे वक्तव्य केले आहे. त्यासोबतच ब्रेस्ट मिल्क दान करण्यामागची अनेक कारण सांगितली आहेत. तसेच या मुलाखतीदरम्यान तिने तिचा वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

निधीने Humans Of Bombay या इन्स्टाग्रामवर पेजवर दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्याबद्दल बरीच माहिती दिली आहे. यावेळी ती म्हणाली, ” या लॉकडाऊन दरम्यान मी १०० लीटर ब्रेस्ट मिल्क प्री मॅच्युअर बाळांसाठी दान केले. मी ३७ वर्षाची असताना eggs फ्रीज केले होते. मला जेव्हा आई व्हायचे होते, त्याचवेळी मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचे होते. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा मुंबईत आली, त्यावेळी मला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले,” असा खुलासा तिने केला.

“मी माझ्या करिअरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. त्यानंतर हळूहळू निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. या सर्व गोष्टीदरम्यान मी माझ्या स्वतःसाठी एक जोडीदार शोधला आणि त्याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. मी ३७ वर्षाची असताना eggs फ्रीज केले होते. मला आई व्हायचे होते. पण त्यासोबतच करिअरलाही प्राधान्य द्यायचे होते. eggs फ्रीज करण्यापूर्वीच मी चित्रपट निर्माता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली. या ठिकाणी येऊन निर्मात्यांमध्ये स्वत: नाव निर्माण करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. मी सहाय्यक निर्माता, टॅलेंट एजंट म्हणूनही काम केले. ही सर्व मजा मस्ती सुरु असताना मी प्रेमात पडली. त्यानंतर मी लग्न केले. लग्नाच्या वेळी माझे वय ३० होते,” असे निधी म्हणाली.

“लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी सहाजिकच माझे कुटुंब, जवळचे नातेवाईक, इतर मित्र-मैत्रिणी यांनी मला फॅमिली प्लॅनिंगबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. एकीकडे लोकांच्या अपेक्षा आणि दुसरीकडे माझे निर्मिती कंपनी सुरु करण्याचे स्वप्न यामुळे मी फार गोंधळली. याच दरम्यान माझ्या पतीने मला eggs फ्रीज करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी माझे स्वप्नही साकार करु शकते आणि त्या eggs द्वारे गर्भधारणाही करु शकते. मी त्याच्या सल्ल्यानुसार वागली. पण त्यावेळी या गोष्टी जगजाहीर करणे फार अवघड होते.” असेही तिने सांगितले.

“पण त्यावेळी मी आणि माझ्या पतीने एक निर्णय घेतला की जर eggs फ्रीज करण्याची पद्धत कामी आली नाही, तर आपण मूल दत्तक घेऊ. पण या गोष्टी आमच्या कुटुंबाला मान्य नव्हत्या. त्याचवेळी माझ्या मित्राने मला सांगितले की, तुला गर्भधारणेसाठी आजीच्या वयात का जायचे आहे? त्याच्या या टोमण्यामुळे मी प्रचंड भावूक झाली. पण आई होण्याबद्दलच्या निर्णयाची भरपाई मला करावी लागेल, हे मला माहित होते. कालांतराने माझे कुटुंब माझ्या सोबत होते. त्यानंतर मी माझी स्वतःची कंपनी सुरू करत ‘सांड की आँख’ हा चित्रपट बनवला. यामुळे माझे एक स्वप्न साकार झाले. यानंतर मी आई होण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी मी नैसर्गिकरित्या गरोदर राहिली.” असे निधी म्हणाली.

निधी पुढे म्हणाली की, “ते ९ महिने खरोखरच फार स्वप्नवत होते. त्यावेळी मला माझ्या मुलावर लक्ष केंद्रित करायचे होते. जेव्हा मी माझ्या सर्वात लहान मुलगा वीरला पहिल्यांदा स्पर्श केला, तेव्हाच्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. जेव्हा मी आई झाली तेव्हा माझे वय ४० होते. यादरम्यान मला माझे करिअर आणि माझी मुले या दोन्हीकडे समान लक्ष द्यावे लागणार होते. पण त्यावेळी मी यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. यामुळे मी माझी गोष्ट जास्तीत जास्त महिलांसोबत शेअर करु इच्छिते, जेणेकरून त्या ही स्वतःला आई होण्यासाठी मानसिकरित्या तयार होतील.”

यानंतर निधीने ब्रेस्ट मिल्क दान करण्याबाबतही वक्तव्य केले आहे. “या काळात मी स्तनपान आणि त्याच्या दानाविषयीच्या जुने समज मोडण्याचा प्रयत्न केला. या लॉकडाऊन दरम्यान मी १०० लीटर ब्रेस्ट मिल्क प्री मॅच्युअर बाळांसाठी दान केले. यादरम्यान मला अनेकदा विचारण्यात आले की मी मुलासाठी माझ्या करिअरमध्ये बदल केला आहे का? पण त्यावेळी मी त्यांना सडेतोड उत्तर दिले. मी हे स्वतः निवडले आहे आणि म्हणून मी वीरच्या आईसह एक निर्माता देखील आहे.” असेही तिने सांगितले.