Sachin Goswami Post Student Protest: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू झालेले आंदोलन आता देशभरात पसरू लागले आहे. २० जुलै रोजी विद्यार्थ्यांनी संसदेवर काढलेल्या मोर्चात पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चे निघत आहेत. अनेक कलाकारही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्याचे दिसत आहे. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीही या प्रकरणी लक्षवेधी पोस्ट केली आहे. हास्यजत्रेच्या उपरोधिक शैलीत त्यांनी सरकारला सल्ला दिला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील काही निवडक कलाकार हे समाजातील विसंगती, चुकीच्या गोष्टींवर स्पष्टपणे भाष्य करत असतात. सचिन गोस्वामी हे त्यापैकीच एक आहेत. सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायावर ते उपरोधिक शैलीतील पोस्टमधून भाष्य करत असतात. विद्यार्थी आंदोलनातही त्यांनी सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर बोट ठेवले आहे.
सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये आदर्श व्यवस्था कशी असावी? याबाबतचे विचार मांडले. ते म्हणाले, “आदर्श व्यवस्था अशी असावी… ज्यात शिक्षण मंत्र्यांच्या मुलाना उत्तम शिक्षणासाठी परदेशी जावे लागू नये. आपल्या बाबाने देशात निर्माण केलेल्या सर्वोत्कृष्ट शिक्षण केंद्रातच ते मिळावे.”
“अशा व्यवस्थेत गृहमंत्र्यांना, अन्य मंत्र्यांना अनावश्यक सुरक्षा ताफ्यात फिरावे लागू नये, त्यांनीच निर्माण केलेल्या शांत, सुरक्षित कायद्याच्या राज्यात निवांत फिरता यावे, चौपाटीवर भेळ खात जगता यावं. तुमच्या आमच्या सारखं. आरोग्य मंत्र्यांच्या कुटुंबाला उपचारासाठी परदेशात नाही तर त्यांनीच उभारलेल्या जागतिक दर्जाच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घेता यावेत उपचार” – सचिन गोस्वामी

खरे रामराज्य हेच
सचिन गोस्वामी पुढे म्हणाले, “आपल्या आया, बहिणी, मुली या निश्चिंत, आणि सुरक्षित होऊन जगाव्यात. आपल्या कर्त्याने निर्माण केलेले हे आदर्श राज्य बघत. शेवटी राजकारणी, नेते ही समाजाचा भागच आहेत. फक्त त्यांच्याकडे आपल्या जनसामान्यापेक्षा हे राष्ट्र सुराज्य बनवावे याची एक संधी जास्त आहे. तिचे सोने केले पाहिजे. खरे रामराज्य हेच आहे.”
धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी सोशल मीडियावर ट्रोल
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी नैमिषा प्रधान हिने विदेशात शिक्षण घेतले आहे. त्यावरून तिला ट्रोल केले जात आहे. नैमिषा प्रधान हिने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसीमधून २०२३ साली मास्टर ऑफ लॉ (LL.M.) ची पदवी पूर्ण केली.

भारतातील विद्यार्थ्यांना सध्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी देशभरातून जंतर-मंतरवर एकवटले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्यातच आता नैमिषा प्रधानच्या इन्स्टाग्राम पोस्टखाली अनेकांनी कमेंट करायला सुरुवात केली. नैमिषाला टॅग करत वडिलांच्या राजीनाम्याबाबत विचारणा होऊ लागली.
महत्त्वाची अपडेट
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश आले असून केंद्रीय धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
