भारतीय क्रिकेटमधील दैवत आणि क्रिकेटरसिकांच्या गळ्यातील ताईत सचिन तेंडुलकरने झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली आणि आपल्या आठवणींचा पट उलगडला. ‘मी स्वप्नांचा पाठलाग करत होतो. ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मला जे करता आले ते सगळे मी केले’ असे सचिनने या वेळी सांगितले.

या कार्यक्रमात सचिनसोबत त्याची पत्नी डॉ. अंजली, भाऊ नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर, बहीण सविता तेंडुलकर, मित्र अतुल रानडे, जगदीश चव्हाण, अजित भुरे हेही सहभागी झाले आहेत.

क्रिकेट खेळायला लागल्यापासून विश्वचषकजिंकण्याचे स्वप्न मी पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी २२ वर्षांची तपश्चर्या मला करावी लागली. माझ्या हातात तो विश्वचषक आला तो माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात अमूल्य क्षण होता, असे सचिनने या वेळी बोलताना सांगितले. क्रिकेटसाठी मला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला असे लोक म्हणतात, मी त्याला त्याग वगैरे म्हणणार नाही. ते माझे आयुष्य होते, असेही तो या वेळी म्हणाला. सचिन तेंडुलकर याच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण ‘सचिन- ए बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. साहित्य सहवास ते शिवाजी पार्क, शारदाश्रम विद्यामंदिर आणि भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला क्षण असा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. हा चित्रपट म्हणजे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची खेळी असून हा चित्रपट आपल्या आई-वडिलांना समर्पित असल्याचे त्याने या वेळी सांगितले. ‘चला हवा येऊ द्या’च्या या विशेष भागात सचिनने क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. सचिनबरोबर रंगलेल्या या गप्पांची मैफल येत्या २२ आणि २३ मे रोजी प्रेक्षकांना आणि सचिनच्या चाहत्यांना झी मराठीवर पाहता येणार आहे.