मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. सचिनच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. याआधी ओडिसा, केरळ आणि छत्तीसगड या तीन राज्यांनी सचिनचा हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सचिनवरचा हा सिनेमा करमुक्त करणारं महाराष्ट्र हे चौथं राज्य आहे. ‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ हा सिनेमा अधिकाधिक लोकांनी पाहावा, तसेच पुढच्या पिढीने यातून प्रेरणा घ्यावी, असा आपला प्रयत्न आहे असे सिनेमाचे निर्माते रवी भागचंडका यांनी सांगितले. तसेच सिनेमा करमुक्त झाल्याने आमच्या प्रयत्नांना मदत होईल असेही ते म्हणाले.

‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ आज देशभरात इंग्रजी, हिंदी, मराठी आणि इतर भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. फर्स्ट डे फर्स्ट शोपासून या सिनेमाचे अनेक शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. त्यामुळे हा सिनेमा चांगली कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी मुंबईत खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सचिनच्या आत्मचरित्रावर कमाल आर खानने विशेष टीप्पणी केली. केआरकेने सचिनच्या आत्मचरित्रपटावर भाष्य करताना म्हटले की, ‘हा सिनेमा जुन्या व्हिडिओंनी बनवलेला सिनेमा आहे. पण हा सिनेमा झेलणं माझ्यासाठी कठीण आहे.’ तसेच जर सचिनच्या या ड्रॉक्युमेंट्रीने जास्त कमाई केली तर कपिल, सेहवाग, कोहली, गंभीर आणि इतर खेळाडूही त्यांच्या डॉक्युमेंट्री बनवतील असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले. एवढंच बोलून तो थांबला नाही तर, कोणाच्याही आयुष्यापेक्षा माझ्या आयुष्यावर बनवलेला सिनेमा अधिक रंजक असेल. कारण यात पुरेपुर मसाला असेल. सेक्स, गुन्हेगारी, प्रेम, व्यवसाय, बॉलिवूड अशा अनेक गोष्टींचा भरणा यात असेल.