मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर लवकरच अवतरणार आहेत. सचिनच्या चाहत्यांसाठी आणि क्रिकेट शौकिनांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. ‘सचिनः अ बिलियन ड्रीम्स’ चित्रपट सचिनच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची खेळी आहे. पण, त्याचसोबत सचिनच्या आयुष्यात त्याच्या कुटुंबाचे विशेषतः त्याचे बाबा रमेश तेंडुलकर आणि भाऊ अजित तेंडुलकर यांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आपल्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या सचिनला ‘सचिनः अ बिलियन ड्रीम्स’ चित्रपट वडिलांना आणि भावाला समर्पित करण्याची इच्छा आहे.

तुझ्या आयुष्यात तू क्रिकेटची निवड केलीस तरी हरकत नाही. अखेर माणूस म्हणून तू कसा आहेस हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे, असे सचिनचे वडील तो लहान असताना त्याला सांगायचे. तर अजितनेही सचिनच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका साकारली. त्याची क्रिकेटशी ओळख करून देणारी व्यक्ती म्हणजे त्याचा भाऊ अजित. तेच सचिनला रमाकांत आचरेकर सरांकडे घेऊन गेले होते. वडिलांनी आणि भावाने दिलेले धडे अजूनही सचिन विसरलेला नाही. त्याच्या यशामध्ये या दोघांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच केवळ क्रिकेटर म्हणून नाही तर एक नम्र आणि विनयशील व्यक्ती म्हणूनही सचिन लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान ठरतो.

‘सचिनः अ बिलियन ड्रीम्स’मध्ये साहित्य सहवास ते शिवाजी पार्क मैदान आणि शारदाश्रम शाळा ते भारतरत्न हा सर्वोच्च किताब स्वीकारतानाचा सचिनचा प्रवास उलगडला आहे. २०० नॉट आउटचे रवि भागचंडका आणि कार्निव्हल मोशन पिक्चर्सचे श्रीकांत भसी यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘सचिनः अ बिलियन ड्रीम्स’ येत्या २६ मेला प्रदर्शित होईल.