इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाई करत ठार केलं. त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर क्षेपणास्त्र डागण्यात आली होती. या हल्ल्यात खामेनी ठार झाले. या घटनेनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान सेक्रेड गेम्स या सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्रीने म्हणजेच एलनाज नौरोजीने आनंद व्यक्त केला आहे. अखेर तो दिवस आला असं एलनाज नौरोजीने म्हटलं आहे. तिची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
एलनाजची पोस्ट काय?
एलनाजने एक पोस्ट शेअर केली आहे त्यात तिने खामेनीचा मृत्यू हा इराणसाठी चांगला दिवस आहे असं म्हटलं आहे. एवढंच नाहीतर तिने म्हटलं आहे की इराणमध्ये अनेक वर्षे मानवाधिकारांचं उल्लंघन होत होतं. गेल्या काही वर्षांमध्ये इराणमध्ये अन्याय वाढला होता. आज चांगला दिवस आहे असं एलनाजने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच एका व्हिडीओत ती नाच करतानाही दिसते आहे, तसंच माझ्या मतांशी डाव्या विचारांचे लोक असहमत होते, आता त्यांना कळलं असेल की मी योग्य होते असंही एलनाजने म्हटलं आहे.
इराणमध्ये जे घडलं ते चांगलं झालं-एलनाज
इराणमध्ये जे काही घडलं त्याची वाट इराणमधले नागरिक मागच्या ४७ वर्षांपासून बघत होते. एवढंच नाही तर या युद्धात जर इराणमधल्या सामान्य नागरिकांचा मृ्त्यू झाला तर त्याची जबाबदारी इराण सरकारची असेल कारण ४७ वर्षांपासून इराणची जनता अन्यायच सहन करते आहे असंही एलनाजने म्हटलं आहे. खामेनी यांच्या मृत्यूची बातमी समोर आली तेव्हा एलनाजने म्हटलं की देव खूप महान आहे. खामेनी मारले गेले या गोष्टीची वाट इराणचे निवासी ४७ वर्षाांपासून बघत होते, आज आनंदाचा दिवस आहे असंही एलनाजने म्हटलं आहे.
कोण आहे एलनाज नौरोजी?
एलनाज नौरोजी ही इराणी जर्मन अभिनेत्री आहे. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमध्ये एलनाज झळकली होती. तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. अनुराग कश्यप दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये तिने एका मोठ्या अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. एलनाजचा जन्म तेहरानमध्ये झाला आहे. ती लहान असताना तिचे आई वडील तिला घेऊन जर्मनीला गेले. २०१७ मध्ये तिने पाकिस्तानी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर सेक्रेड गेम्समुळे तिला जगात प्रसिद्धी मिळाली. अभय, मेड इन हेवन, जुग जुग जियो आणि मस्ती ४ या चित्रपटांमध्येही एलनाजने काम केलं आहे. २०२३ मध्ये तिने कंधार या हॉलिवूड चित्रपटातही काम केलं.
