सध्या ‘समांतर’ ही वेब सीरिज चर्चेत आहे. या सीरिजचा दुसरा सिझन १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये काय पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘समांतर’मध्ये स्वप्नील जोशी, नितीश भारद्वाज आणि तेजस्विनी पंडित मुख्य भूमिकेत आहेत. पण आता ‘समांतर २’मध्ये आणखी एका अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये सई ताम्हणकर दिसली होती. सई कुमार महाजनच्या आयुष्यात गुंतागुंत निर्माण करत असल्याचे दिसत आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये आपण सईची झलक पाहिलेलीच आहे. कुमार ज्या नियतीच्या शोधात आहे, सई त्याचा भाग असेल का? कुमार आणि निमाच्या वैवाहिक आयुष्यात ती व्यत्यय आणणार का? ती चक्रपाणी यांच्यासोबत का दिसली? याचा अर्थ असा आहे की, सई यात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे का? प्रेक्षकांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आज सईने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या गोपनीयतेने झाकलेल्या व्यक्तिरेखेवर प्रकाशझोत टाकणारा प्रोमो तिच्या चाहत्यांसाठी आणला आहे.




आणखी वाचा : ‘एकाचे कर्म, दुसऱ्याचे भविष्य’, समांतर २चा ट्रेलर प्रदर्शित
View this post on Instagram
समांतर १ मध्ये कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला. जो आधीच कुमारचे आयुष्य जगला आहे आणि कुमारच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे, हे त्याला माहित आहे. सिझन २ मध्ये चक्रपाणी त्याच्या डायरीत लिहिलेला भूतकाळ कुमारच्या स्वाधीन करतो. आणि दरदिवशी एक पान वाचण्यास सांगतो, ज्यात कुमारचे भविष्य लिहिलेले आहे. यादम्यान त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश होणार असल्याचे भाकीत असते. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला हीच नशिबाची साथ आहे का, याचा शोध १० भागांच्या थ्रिलरमध्ये आहे.
‘समांतर २’ ही वेब सीरिज १ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सीरिजमध्ये स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडीत, नीतीश भारद्वाज आणि सई ताम्हणकर दिसणार आहेत. ही १० भागांची सीरिज मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना ही सीरिज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.