दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित ‘सैराट’ चित्रपटाची मूळ प्रिंट प्रदर्शनापूर्वीच लीक झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंजुळे यांनी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे.

‘सैराट’मधली ती विहीर हीच का?

‘सैराट’ चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुफान प्रतिसाद मिळतो आहे. पण त्यासोबतच चित्रपटाची ३ जीबीची मूळ प्रिंट सध्या मोबाईलवर व्हायरल झाली आहे. नागराज यांना याबाबत समजताच त्यांनी मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. वांद्रे येथील सायबर पोलीस ठाण्यात मंजुळे यांनी याप्रकरणी लेखी तक्रार देखील दाखल केली आहे.

सैराटमुळे ‘ब्लॅक’वाले जोरात..

‘सैराट’ प्रदर्शित होण्याच्या दोन दिवस आधीच चित्रपटाच्या तीन वेगवेगळ्या प्रिंट लीक झाल्याचे समोर आले होते. यापैकी दोन प्रिंट या प्रोसेस प्रिंट असून उर्वरित प्रिंट सेन्सॉर प्रिंट आहे. तसेच एका प्रिंटला ट्रेलर देखील जोडलेला आहे, असे ‘झी स्टुडिओ’चे निखिल साने ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत १२.१० कोटींचा गल्ला जमवला आहे. परशा-आर्चीच्या प्रेमकहाणीला लोकांनी डोक्यावर घेतलं आहे, तर अजय-अतुलच्या गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादानुसार हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच सर्वात यशस्वी चित्रपट ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र, पायरसी प्रकरण पुढे आल्याने ‘झी स्टुडिओ’ आणि नागराज यांनी चिंता व्यक्त केली आहे.