मुंबईत रविवारी संध्याकाळी पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ मध्ये, फहीम अब्दुल्ला याला ‘सैयारा’ चित्रपटाच्या शीर्षक गीतासाठी ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक’ हा पुरस्कार मिळाला. फहीम हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः उपस्थित राहू शकला नाही, त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांनी त्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी मोहित सुरी यांनी फहीमच्या संघर्षाचा प्रवास सांगितला. या चित्रपटाच्या यशानंतर त्याचं आयुष्य कसं बदललं, ते सर्वांना सांगितलं.
पुरस्कार सोहळ्यात बोलताना मोहित म्हणाला, फहीमला गायक बनायचं होतं, तरीही त्याने परीक्षा देणं कधीच सोडलं नाही. या स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळेल की नाही, याची त्याला खात्री नव्हती. “जेव्हा मी फहीमला भेटलो, तेव्हा तो वारंवार परीक्षा देत होता. मी त्याला विचारायचो की, ‘तू या परीक्षा कशासाठी देतोयस?’ त्यावर तो म्हणाला, ‘माझ्या करिअरचे पुढे काय होईल आणि मला यश मिळेल की नाही, हे मला माहीत नाही.’ या चित्रपटात काम मिळण्यापूर्वी फहीम आणि अर्सलान निजामी ‘अटल सेतू’वर काम करत होते. आज मिळालेल्या या पुरस्काराने हे सिद्ध केलंय की, तुला आता त्या नोकरीची गरज नाही. तू या इंडस्ट्रीत नक्कीच यशस्वी होणार आहेस,” असं मोहित सुरी म्हणाला.
‘सैयारा’च्या शीर्षक गीताचा सह-संगीतकार अर्सलान निजामी हा एक सिव्हिल इंजिनिअर आहे, त्याने संगीताच्या आवडीसाठी आपली नोकरी सोडली. फहीम अब्दुल्ला हा मूळचा श्रीनगर, काश्मीर येथील एक अष्टपैलू कलाकार आहे. तनिष्क बागची आणि अर्सलान निजामी यांनी या गाण्याचं संगीत दिलं आहे, तर फहीमने या सुपरहिट गाण्याला आपला आवाज दिला आहे.
फहीमने या श्रेणीतील अनेक नामवंत गायकांना मागे टाकत करून हा पुरस्कार मिळवला. या पुरस्कारासाठी ‘धुरंधर’च्या शीर्षक गीतासाठी हनुमानकाईंड, सुधीर यदुवंशी, शाश्वत सचदेव आणि मोहम्मद सादिक यांना नामांकन मिळालं होतं. तसेच, ‘धुरंधर’मधील ‘गेहरा हुआ’ या गाण्यासाठी अरिजित सिंग, शाश्वत सचदेव आणि अरमान खान यांना नामांकन मिळालं होतं. ‘सैयारा’मधील ‘धून’ गाण्यासाठी अरिजित सिंग आणि ‘बरबाद’ गाण्यासाठी जुबिन नौटियाल यांनाही नामांकन मिळालं होतं.
‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’द्वारे सुरू करण्यात आलेले ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ देशातील अत्यंत विश्वासार्ह चित्रपट पुरस्कारांपैकी एक मानले जातात. या पुरस्कारांसाठी नामांकन आणि विजेत्यांची निवड ‘स्क्रीन अकादमी’ द्वारे करण्यात आली. ही एक स्वतंत्र आणि नफा न मिळवणारी संस्था असून, यामध्ये ५३ चित्रपट निर्माते, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन झाकीर खान, सुनील ग्रोव्हर व आलिया भट्ट यांच्याबरोबर इंडियन एक्सप्रेस हिंदीचे एडिटर सौरभ द्विवेदी यांनी केले.
