Dhurandhar 2 Review by Saleel Kulkarni : सलील कुलकर्णी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक व संगीतकार आहेत. त्यासह ते चित्रपट दिग्दर्शकही आहेत. त्यांना त्यांच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. सलील कुलकर्णी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील तसेच कामासंबंधित अपडेट्स सोशल मीडियामार्फत चाहत्यांसह शेअर करत असतात.

सलील कुलकर्णी इंडस्ट्रीतील घडामोडींबद्दलची त्यांची मतंही वेळोवेळी व्यक्त करत असतात. अशातच आता त्यांनी ‘धुरंधर २’बद्दलचं त्यांचं मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी आदित्य धरचं कौतुक करत व्हिडीओ शेअर कला आहे. त्यामधून त्यांनी चित्रपटातील संगीताचं विशेष कौतुक केलंय.

आदित्य धर लिखित व दिग्दर्शित ‘धुरंधर २’ची सध्या सर्वत्र क्रेझ आहे. मनोरंजन विश्वातील अनेक जण हा चित्रपट, त्यातील कलाकार आणि चित्रपटाची कथा व संगीत यांचं कौतुक करत आहेत. अशातच आता सलील कुलकर्णी यांनीसुद्धा त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सलील कुलकर्णी आदित्य धरबद्दल आणि ‘धुरंधर २’मधील गाण्यांबद्दल नेमकं काय म्हणाले, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

‘धुरंधर २’बद्दल काय म्हणाले सलील कुलकर्णी?

सलील कुलकर्णी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ‘धुरंधर २’बद्दल म्हणाले, “मित्रांनो, ‘धुरंधर २’ बघायला तर मजा आलीच; पण ऐकायलाही मजा आली. बॅकग्राऊंड स्कोअरचा पूर्णपणे वेगळा विचार करण्यात आला आहे. त्या काळातली ९० मधील गाणी वेगळ्या पद्धतीनं येतात आणि इंटेन्स सीन्सला नेहमीप्रमाणे जे म्युझिक असतं, ते न देता एक वेगळंच गाणं वाजतं. त्याचा वेगळा संदर्भ आहे. मग तिरछी टोपीवाले हे गाणं येतं. त्यानंतर दुसरं गाणं ऐकायला मिळतं.”

चित्रपटाबद्दल सलील पुढे म्हणाले, “गोष्ट सांगणार नाही. कारण- स्पॉयलर द्यायचा नाहीये; पण दुष्ट शक्तीविषयी बोलणारा हा चित्रपट आहे. दहशतवादाविरुद्ध बोलणारा चित्रपट आहे. मला तर खूप आवडला. खूप ठिकाणी मला भरून आलं. खूप ठिकाणी असं वाटलं की, असंच पाहिजे या दहशतवाद्यांना. मला असं वाटतं की, क्रूर आणि नकारात्मक शक्तींबद्दलचा हा चित्रपट आहे. जरूर बघा. भारतीयांनी एकत्र येऊन हा चित्रपट बघण्यात मजा आहे. भारताचा क्रिकेटचा सामना बघताना जी मजा येत ना, ती मजा आली मला ‘धुरंधर २’ बघताना. बॅकग्राऊंड म्युझिक आणि आदित्य धरची विचारधारा कमाल आहे. रजनीकांतसरांनी कौतुक केलंय. रजनीसर म्हणतायत की, बॉक्स ऑफिसचा बाप. अजून काय पाहिजे मग? मला असं वाटतं की, खूप संघर्ष करून हा माणूस इथपर्यंत आलाय. त्याला सलाम तर केला पाहिजे. मी ‘धुरंधर २’ एकदा पाहिलाय; पण मला असं वाटतंय की, पुन्हा पाहिला पाहिजे.”

सलील कुलकर्णी चित्रपटाच्या कमाईबद्दल पुढे म्हणाले, “लोक म्हणतात की, आखाती देशात चित्रपट चालला, तर कमाई होते वगैरे. तिथे चित्रपटावर बंदी आहे. तरीही कोट्यवधी कमावले. पण, कमाल झालाय चित्रपट. भारताच्या बाजूने बोलणारा चित्रपट आहे. भारताच्या विरुद्ध जे काम करतात, त्यांच्या विरुद्ध बोलणारा चित्रपट चालायलाच पाहिजे. जय हिंद”.