Saleel Kulkarni Emotional post: आशा भोसले यांचे आज १२ एप्रिल २०२६ ला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या भेटीदरम्यानचे किस्से सांगितले आहेत.
“चंद्र उगवेल का आता आकाशात ?”
सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “चंद्र उगवेल का आता आकाशात ? चांदणे तसेच बरसेल का? ही फक्त एक व्यक्ती नव्हती हा फक्त एक आवाज नव्हता. आपल्या आयुष्याचा भाग होता आणि आहे.आपल्या घरातल्या छोट्या मुलीपासून ते आजीपर्यंत सगळ्यांच्या भावना व्यक्त करणारा आवाज”, असे लिहित त्यांनी भावना व्यक्त केल्या.
“तुमच्या गाण्यांनी दिवसाची सुरुवात…”
सुकन्या मोनेंनी लिहिले, “तुमच्या गाण्यांनी दिवसाची सुरुवात होते. स्वयंपाक, घरून शूटिंगला जाताना सुखकर प्रवास तुमच्या आवाजाने होतो. मेकअप रूममध्ये तुमचाच आवाज घुमत असतो. पॅकअप झाल्यावरही ‘ नक्षत्रांचे देणे’ ऐकत ऐकत घरी येते. तुमच्याच आवाजाने दिवस संपतोही. आशाताई तुम्ही कायम आमच्याबरोबर आहात. आम्ही, आमची लेकरं भाग्यवान की तुमचीच गाणी, तुमचाच आवाज सतत आमच्या मनात, कानात रुंजी घालत राहील. आम्ही तुमच्या या ऋणात राहू, कारण तुम्ही आम्हाला चांगलं ऐकायला शिकवलं.”
पुढे त्यांनी लिहिले, “माझ्या जुलियाच्या तुम्ही आशा आजी आहात, तिलाही तुमच्या ‘केव्हा तरी पहाटे’ गाण्याने भुरळ घातली. ५ मे १९९२ ला अक्षय्य तृतीया होती, त्या दिवशी ‘ताईच्या बांगड्या’ चित्रपटाचा मुहूर्त होता, तेव्हा हा फोटो काढला होता.”
सुकन्या मोने यांनी पुढे लिहिले, ” त्यानंतर आमचं लग्न झाल्यानंतर सिटी लाईट मार्केटमध्ये भेटलात. मला म्हणालात, चल माझ्या बाईकडून मासे घेऊन देते. मी म्हटलं अहो मी शाकाहारी आहे, तर म्हणालात थांब मग आलेच आणि येऊन माझ्या कुसुम मनोहर लेले नाटकातल्या भूमिकेचे भरभरून कौतुक केले. विस्मयचकित होऊन मी फक्त तुमच्याकडे बघत होते. बापरे! स्मरणशक्तीचं आणि मनाच्या मोठेपणाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मन मानायला तयार नाहीये की तुम्ही आमच्यात नाहीत. तुम्ही आमच्या मनात, हृदयात, चराचरात आहातच,” असे लिहित सुकन्या मोने यांनी आशा भोसले यांची आठवण सांगितली.
“महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेलं खणखणीत स्वरयंत्र म्हणजे आशाताईंचा गळा”
वंदना गुप्ते यांनी लिहिले, “महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेलं खणखणीत स्वरयंत्र म्हणजे आशाताईंचा गळा. सगळ्या गाणप्रकारात त्या-त्या गाण्याचं वैशिष्ट, प्रसंगाची गरज, गाणं पडद्यावर सादर करणारी अभिनेत्री, तिचा स्वभाव, कवींनी लिहिलेले शब्दांचे खेळ याचा आशाताई सर्वांगानी विचार करत आणि मग रियाज करून आपल्या कमावलेल्या आवाजातून, सगळ्या करामती करत करत स्वरातून अभिनयांकित गाणं सादर करणे ही आशाताईंची खासियत होती.”
“आशा ताईंनी गायलेलं कुठंही गाणं म्हणजे एक संपूर्ण कथा, संपूर्ण कादंबरी, आपल्या डोळ्यासमोर त्या त्या भावनेसह उभी राहते इतकं ते परिपूर्ण असायचं. असा एकही गाण्याचा प्रकार नाही ज्यावर त्यांनी आपली स्वर्गीय सुरांची छाप सोडली नाही.भारताच्या संपूर्ण नकाशावरचा कानाकोपरा लतादीदी आणि आशाताई ह्या दोन भगिनींनी त्यांच्या गाण्यांनी व्यापून टाकलाय असं सहज म्हणता येईल.आशाताई तुम्ही अमर आहातच”, असे लिहित वंदना गुप्ते यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, अमृता खानविलकर, सचिन पिळगांवकर, शाहरुख खान, विकी कौशल, अभय वर्मा अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
