ईदच्या मुहूर्तावर बॉलीवुडवर धमाकेदार सुरुवात करणाऱ्या सलमान खानचा ‘सुलतान’ हा चित्रपट लवकरच २०० कोटींच्या कमाइचा आकडा गाठणार आहे असे दिसून येत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच ‘सुलतान’बाबत कमालीची उत्सुकता आहे. चाहत्यांकडून सध्या ‘सुलतान’रुपी सलमानचे तोंडभरुन कौतुक केले जात आहे. पण या चित्रपटातील काहीशा वयोवृद्ध भूमिकेसाठी काही प्रसारमाध्यमे आणि सोशल नेटवर्किंग साइट्सवरुन ‘आजोबा’ असे म्हणत वयाची पन्नाशी गाठलेल्या सलमान खानची खिल्लीही उडवली जात आहे. या घटनेबाबत खुद्द सलमानने काही प्रतिक्रिया दिली नसली तरीही सलमानचे वडिल, लेखक-अभिनेता असणाऱ्या सलीम खान यांनी मात्र खिल्ली उडवणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. आपल्या मुलासाठी पुन्हा उभ्या ठाकलेल्या सलीम खान यांनी ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत सलमानला वृद्ध, आजोबा संबोधणाऱ्यांना ‘अशी विधाने करण्याआधी प्रथम त्याने ‘सुलतान’मध्ये साकारलेली भूमिका पाहावी’ असा सल्ला दिला आहे.
सध्या सर्वत्र चर्चा असणाऱ्या सलमानच्या ‘सुलतान’ या चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनात चांगलेच घर केले आहे. बॉलीवुड वर्तुळात सलमानने साकारलेला ‘सुलतान अली खान’ आणि अनुष्का शर्माने साकारलेली कुस्तीपटू ‘आरफा’ यांच्या संवेदनशील प्रेमकथेसोबतच, चित्रपटाचे संगीतही चांगलेच गाजत आहे. त्यामुळे देशात गाजलेली ‘रे सुलतान’ची आरोळी आंतराष्ट्रीय स्तरावर आणखी किती प्रसिद्धि मिळवेलर याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे.