मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनबाबत ट्विटरद्वारे सहानुभुती दर्शविणाऱ्या अभिनेता सलमान खानला सेलिब्रिटी असल्यामुळे लक्ष्य करण्यात आल्याचे, त्याचे वडील सलीम खान यांनी म्हटले आहे. गेल्या रविवारी सलमानने याकूबच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटमुळे खळबळ माजली होती. सलमानने केलेले ट्विट हे बालिश आणि अर्थहीन असल्याचे सलीम खान यांनी तेव्हा म्हटले होते.
आता या गोष्टीला आठवडा उलटला असून, याकूबलाही फाशी देण्यात आली आहे. त्यानंतर आज एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान यांनी ट्विटरप्रकरणावर आपले मत मांडले. सलीम खान म्हणाले, की माझ्या मुलाला सेलिब्रेटी असल्याने लक्ष्य करण्यात येते. यामुळे जास्त प्रसिद्धी मिळते. याकूबच्या विषयावर भाष्य करणारा सलमान काही एकटा नव्हता. त्याने केलेल्या ट्विटनंतर त्याचा सर्वात पहिला मीच निषेध केला आणि त्याला ट्विट मागे घेण्यास सांगितले. नसिरुद्दीन शहा, शत्रुघ्न सिन्हा, न्यायाधीश मार्कण्डेय, महेश भट काटजू यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींना याकूबच्या फाशीला विरोध दर्शविला होता. पण, त्यांच्याबाबत कोणीच काही बोलले नाही. सलमान बिग स्टार असल्याने सर्वांनी त्यालाच लक्ष्य केले. तो एक मोठा स्टार आहे त्यामुळे त्याला लक्ष्य करून अधिकाधिक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय.  त्याचे वडील म्हणून मला त्याचा अभिमान वाटत असल्याचेही ते म्हणाले.