..म्हणून सलमानने वरुणला दिली कपड्यांनी भरलेली बॅग

माझ्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे

varun, salman
वरुण धवन, सलमान खान

करण जोहरच्या ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ या चित्रपटाने बी टाऊनमध्ये पदार्पण करणाऱ्या वरुण धवनने त्याचा वेगळा असा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. सध्या वरुण त्याच्या आगामी ‘जुडवा २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच तो दुहेरी भूमिका साकारणार असल्यामुळे त्याच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या या चित्रपटासाठी सध्या अभिनेता वरुण धवन फारच मेहनत घेताना दिसत आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या वरुणने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपटाच्या तयारीबद्दल माहिती दिली आहे. ‘जुडवा २’ चित्रपटाबद्दल बोलताना वरुण म्हणाला की, ‘जुडवा २ ही दोन भावांची गोष्ट असणार आहे. सलमान भाई, माझे वडिल आणि साजिद सरांनी प्रेक्षकांवर सोडलेली छाप पुसण्याचा मी प्रयत्न करणार नाहीये. पण, माझ्या अभिनयाद्वारे मी प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन’. यावेळी त्याने ‘जुडवा’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या काही आठवणीही सांगितल्या. याच आठवणी सांगताना वरुण म्हणाला, ‘मला आठवतंय, ‘जुडवा’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी मी सलमान खानला ‘अंकल’ (काका) म्हणून हाक मारली होती. त्यावर सलमान म्हणाला होता, ‘जर का तू मला ‘अंकल’ म्हणालास तर, मी तुला बांधून ठेवेन’. अभिनेता सलमान खान हा नेहमीच कलाकारांच्या मदतीला धावून येतो. त्याlही ‘जुडवा’ या त्याच्या चित्रपटाचा रिमेक येत असल्यामुळे खुद्द सलमानही या वरुणच्या या चित्रपटासाठी उत्सुक आहे. वरुणला राजा ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सलमान मदत करत आहे. याबदद्लच सांगताना वरुण म्हणाला, ‘मला त्याने (सलमानने) बॅग भरुन जिन्स दिल्या आहेत. मी जे काही केले आहे, त्याबद्दल भाईला माझा अभिमान आहे’. त्यामुळे आता भाईजानने पाठवलेल्या या मदतीमुळे वरुण ‘राजा’ ही व्यक्तिरेखा कितपत पार पाडू शकेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

१९९७ ला प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शनसुद्धा डेविड धवन यांनीच केले होते. त्यामुळे येत्या काळात ‘जुडवा २’ या चित्रपटामध्ये वरुण धवन सलमान खानची भूमिका वठवू शकेल का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. ‘जुडवा ’ या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान, अभिनेत्री रंभा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. सलमानच्या या चित्रपटाला मिळालेली लोकप्रियता लक्षात घेता वरुणसमोर हे एक प्रकारचे आव्हान आहे असेच म्हणावे लागेल. याआधी वरुणने त्याच्या वडिलांच्या दिग्दर्शनात ‘मै तेरा हिरो’ या चित्रपटामध्ये काम केले होते. सध्या वरुण धवन ‘बद्रिनाथ कि दुल्हनिया’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये तो आलिया भट्टसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salman bhai sent me a suitcase full of jeans for rajas character in judwaa 2 says varun dhawan