प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांनाही गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेला ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. आत्तापर्यंत ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमानच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ‘बजरंगी भाईजान’चे मुख्य आकर्षण सलमान खान असला तरी भारत-पाक संबंधावर आधारित कथानक, चित्रपटातील गाणी आणि सलमान-करिनातील केमेस्ट्रीच्या जोरावर चित्रपट यशस्वी होणार का, याकडे बॉलीवूडसह चित्रपटरसिकांचे लक्ष लागले आहे. पारंपरिक बॉलीवूडपट असणाऱ्या या चित्रपटातील कोणते घटक प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणतील, यावर टाकलेली एक नजर.

सलमान खान- बॉलीवूडमध्ये सलमान खान या नावामागे प्रचंड असे फॅन फॉलोइंग आहे. चित्रपट कसाही असो सलमानचे हे कट्टर चाहते त्याचा प्रत्येक चित्रपट हटकून पाहतात. त्यामुळे ‘बजरंगी भाईजान’चा सर्वात मोठा युएसपी हा सलमान खानच आहे. याशिवाय, आत्तापर्यंत ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमानच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

सलमान आणि करिनाची केमेस्ट्री- या चित्रपटाचे दुसरे मुख्य आकर्षण असेल ते म्हणजे सलमान खान आणि करिना कपूर यांच्यातील केमेस्ट्री. यापूर्वी आलेल्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटाच्यावेळी ही जोडी लोकप्रिय झाली होती. त्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा हिट ठरेल, अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे. करिना कपूर या चित्रपटात एका शिक्षिकेची भूमिका साकारत आहे.

कबीर खान- ‘बजरंगी भाईजान’चा दिग्दर्शक कबीर खानचे आजपर्यंतचे चित्रपट पाहता त्याने आपल्या प्रत्येक चित्रपटातून समाजापर्यंत काहीतरी संदेश पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीही प्रेक्षकांना आवडतील असे व्यावसायिक चित्रपट देण्यात कबीर खान नेहमीच यशस्वी ठरला आहे. त्यामुळे ‘बजरंगी भाईजानच्या’निमत्ताने हे समीकरण पुन्हा एकदा जुळून येईल, अशी आशा आहे.

हर्षाली मल्होत्रा- चित्रपटाच्या ट्रेलर्सच्यावेळी सलमान आणि करिनाबरोबर हर्षाली मेहता या लहान मुलीनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हर्षाली या चित्रपटात एका मुक्या मुलीची भूमिका साकारत असून सलमान तिला सोडण्यासाठी पाकिस्तानमध्ये जातो, असे एकंदर चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटातील बालकलाकार नेहमीच प्रेक्षकांच्या औत्स्युकाचा विषय असतात, ही गोष्ट चित्रपटासाठी फायदेशीर ठरू शकते.

संगीत- सलमानच्या आजपर्यंतच्या अनेक चित्रपटांतील गाणी ही लोकप्रिय झाली आहेत. त्याप्रमाणेच ‘बजरंगी भाईजान’मधील ‘सेल्फी ले ले रे’,  ‘तु चाहिये’ ही गाणी आत्तापासूनच सगळीकडे ऐकू येऊ लागली आहेत. याशिवाय, आतिफ अस्लमने संगीत दिलेले अदनान सामीच्या आवाजातील ‘भर दो झोली मेरी’ हे सुफी गाणेही प्रेक्षकांना भावले आहे.

भारत-पाक संबंध- आजवरच्या बॉलीवुडपटांमध्ये भारत-पाक संबंधावर आधारित असलेल्या कथानकांचा वापर अनेकदा यशस्वी ठरताना दिसला होता. सलमान खानच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचे कथानकही भारत-पाक संबंधावर आधारित होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामुळे ‘बजरंगी भाईजान’ हिट होण्यासाठी हा घटक पुन्हा एकदा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.