सलमान खानचा आगामी ‘दबंग ३’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील ‘हुड हुड दबंग’ या गाण्यावर हिंदू जनजागृती समितीने आक्षेप घेतला असून सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याची मागणी केली आहे. या गाण्यात हिंदू साधू तसेच भगवान शिव, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप या समितीने केला आहे.

‘हुड हुड दबंग’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. ‘या गाण्यात सलमानसोबत साधूंना नाचताना दाखवले आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सलमानने हिंदू साधूंचा अवमान केला आहे, तशा प्रकारे मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना नाचताना दाखवण्याचे धाडस दाखवेल का, असा प्रश्‍न हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केला आहे.

आणखी वाचा : जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाने घेतल्या हार्मोन्सच्या गोळ्या

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबई येथे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे निवेदनाद्वारे ‘दबंग ३’ या चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रसंग वगळावेत आणि तोवर या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.