वीस वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवलं. पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर सलमान शनिवारी जामिनावर सुटला. या संपूर्ण प्रकरणात मुख्य भूमिका बजावली ती म्हणजे बिष्णोई समाजाने. आता याच बिष्णोई समाजातील काही व्यक्तींनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी आणि अश्लिल मेसेज पाठवल्याप्रकरणी सलमानची सहकलाकार कनिका सदानंदने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. कनिका सदानंदने ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात सलमानसोबत भूमिका साकारली होती.

काळवीट शिकार प्रकरणात सलमानच्या शिक्षेवरील सुनावणीदरम्यान कनिका काही वृत्तवाहिन्यांच्या चर्चांमध्ये सहभागी झाली होती. बिष्णोई समाजाने सलमानच्या जामिनाला विरोध न करता त्याला वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन लोकांसमोर उदाहरण सादर करावं असं मतं तिने या चर्चांदरम्यान मांडलं होतं. त्याचप्रमाणे तिने बिष्णोई समाजावर टीका केली होती. यानंतर लगेच तिला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्याचं तिने म्हटलं.

PHOTO: ‘नकळत सारे घडले’मध्ये नेहाचा अनोखा अंदाज 

कनिकाने त्या सर्व फोन कॉल्स आणि मेसेजचे रेकॉर्ड पोलिसांना दिले असून याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर तिला पोलिसांकडून सुरक्षाही पुरवण्यात आली आहे.

मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.