‘ट्युबलाइट’मधील सलमानच्या सहकलाकाराची झलक

कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे

छाया सौजन्य- ट्विटर

अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘ट्युबलाइट’ सुरुवातीपासूनच चर्चेत होता. कबीर खान सोबत सलमानचा हा तिसरा चित्रपट असल्यामुळे चाहत्यांमध्येही चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळात आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याची वाढती लोकप्रियता पाहता सलमान खान आणि दिग्दर्शक कबीर खान सोशल मीडियावर या चित्रपटासंबंधीचे काही फोटो आणि व्हिडिओ सतत पोस्ट करत असतात. अशाच काही फोटो आणि व्हिडिओंमध्ये भर घालण्यासाठी सलमानने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटातील एका नव्या कलाकाराचा फोटो शेअर केला आहे. ‘ट्युबलाइट’मधील हा कलाकार सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहे.

सलमानने त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातील माटिन रे तंगू या बालकलाकाराचा फोटो नुकताच शेअर केला आहे. भाईजान सलमानने त्याच्या अकाऊंटवरुन दोन फोटो शेअर करत त्यासोबत ‘इन्ट्रोड्यूसिंग माटिन रे तंगू’ असे कॅप्शन दिले आहे. या दोन्ही फोटोंमध्ये सलमान आणि माटिनची दोन विविध रुपे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या निरागस माटिनसोबत सलमानला चित्रपटात पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. कबीर खान दिग्दर्शित ट्युबलाइट या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खानसोबतच काही नवे चेहरेही झळकणार आहेत. ज्यामध्ये चिनी अभिनेत्री झू झू सोबतच आता लहानग्या माटिनच्या नावाचाही समावेश झाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सोहेल खान, शाहरुख खान यांच्याही काही भूमिका असल्याचे कळत आहे.

तसं पाहायला गेलं तर अभिनेता सलमान खान आणि लहान मुलं यांचे समीकरण चांगलेच जुळून येते. एखाद्या बालकलाकारासोबत स्क्रिन शेअर करण्याची सलमानची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये बालकलाकारांसोबत काम केले आहे. पण, त्याच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी विशेष पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत हर्षाली मल्होत्रा ही बालकलाकारही झळकली होती. सलमान आणि हर्षालीच्या निरागस नात्याला प्रेक्षकांनीही चांगलीच दाद दिली होती.

दरम्यान, सलमानच्या या आगामी चित्रपटामध्ये तो नेहमीपेक्षा एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, भारत आणि चीन दरम्यान १९६२ मध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. या चित्रपटात एका सुरेख प्रेमकहाणीचे चित्रण करण्यात आले आहे. सलमानच्या इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटातील त्याची भूमिका फार वेगळी असणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सलमानचा ‘ट्युबलाइट’ चित्रपट येणाऱ्या काळात अनेक कारणांनी गाजणार असेच दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salman khan introduces his lil co star matin rey tangu from the film tubelight see pics

ताज्या बातम्या