Salman Khan Old Video Of Confessing Blackbuck Hunt Case : काळविटची शिकार केल्याच्या आरोपाखाली सलमान खान १९९९ सालापासून सातत्याने चर्चेत आहे. हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी सलमान खानला अटकही झाली होती. परंतु, कालांतराने त्याची सुटका झाली. हे प्रकरण दरवर्षी सातत्याने चर्चेत येतं. त्यानुसार, लॉरेन्स बिश्नोईने दिलेल्या धमकीच्या निमित्ताने आता पुन्हा या प्रकरणाची चर्चा होऊ लागली असून सलमानचा खानचा एक जुना व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
२००८ साली ऑन दि काऊच विथ कोएल या शोमध्ये सलामान खानची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीची एक क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच मुलाखतीत सलमानने काळवीटला मारल्याचा दावा फेटाळून लावला होता.
सलमान खान म्हणाला, “या घटनेमागे मोठी स्टोरी आहे. पण काळवीटची शिकार करणारा मी नव्हतो.” त्यावर पत्रकार म्हणाली की, तू कोणाचं नाव घेतलं नाहीस म्हणून तुझ्यावर आरोप केला जातोय. त्यावर सलमान खान म्हणाला की, “याला आता काहीच अर्थ नाही. कोणालाच या प्रकरणातील एक टक्काही सत्य माहीत नाही. मी कोणाचंच नाव घेऊ शकत नाही.”
हेही वाचा >> सलमान खानचा ३० वर्षे बॉडीगार्ड असलेल्या ‘शेरा’ची गोष्ट! त्याचं खरं नाव, वय माहितीये का? जाणून घ्या…
तू शांत राहणं पसंत केलं का, असाही प्रश्न सलमान खानला विचारण्यात आला. त्यावर सलमान खान म्हणाला, “कारण मला त्याची गरज नाही वाटली. प्रतिष्ठा, प्रामाणिकपणा आणि कर्मावर माझा विश्वास आहे. मी कर्मावर विश्वास ठेवतो.”
सलमान खानला सातत्याने धमक्या
काही दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली. दरम्यान, सलमान खानलाही सातत्याने धमकी प्राप्त होत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल आला होता. बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षाही भयंकर अवस्था केली जाईल, असा इशारा यातून देण्यात आला होता.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा संदेश आला होता. यामध्ये ५ कोटींच्या खंडणीचा उल्लेख होता. तसेच, ही धमकी गांभीर्याने घेण्यासही बजावलं होतं. “हा मेसेज हलक्यात घेऊ नका. जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल आणि लॉरेन्स बिश्नोई गँगशी असणारं वैर त्याला संपवायचं असेल, तर त्याला ५ कोटींची रक्कम द्यावी लागेल. जर पैसे मिळाले नाहीत, तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल”, असं या संदेशात लिहिल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं. दरम्यान, काही दिवसांनी ही धमकी चुकून सेंड झाल्याचाही मेसेज मुंबई पोलिसांना आला होता.