दुबईवरून तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या एका विमानात सह-वैमानिकाने कॉकपिटमध्ये दुसऱ्या वैमानिकावर भीषण हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात भारतीय वैमानिक स्मित मच्छार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘फ्लायदुबई’च्या एका विमानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न स्मित मच्छार यांनी हाणून पाडला आणि तब्बल १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. विमान हवेत असताना घडलेल्या या घटनेदरम्यान स्मित मच्छार यांनी दाखवलेलं धैर्य आणि जबाबदारीची जाणीव या त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल जगभरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे. अभिनेता सलमान खानने शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पायलट स्मित मच्छार यांच्या धैर्याचं कौतुक केलं आहे.
सलमान खानने काय म्हटलं?
सलमान खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) शुक्रवारी रात्री पोस्ट करत म्हटलं की, “कमाल केली पायलट साहेब. आम्ही सर्वजण तुम्हाला सलाम करतो. तुमच्याबरोबर उड्डाण करणं (विमान प्रवास) ही आनंदाची गोष्ट असेल. वेल डन ब्रो”, अशा शब्दांत सलमान खानने स्मित मच्छार यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.
‘फ्लायदुबई’च्या विमानात काय घडलं?
‘फ्लायदुबई’ या विमान कंपनीचं एक विमान दुबईवरून तेल अवीवच्या दिशेने जात होतं. या विमानाने जवळपास १८० प्रवासी प्रवास करत होते. या विमानाने दुबईवरून उड्डाण केल्यानंतर ३४ हजार फूट उंचीवर असताना कॉकपिटमध्ये पायलट व को-पायलट यांच्यात अचानक बाचाबाची झाली, त्यानंतर काही क्षणांत सह-वैमानिकाने वैमानिकावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये स्मित मच्छार गंभीर जखमी झाले.
या वादामुळे ३४ हजार फुटांवरून अवघ्या एका मिनिटात हे विमान थेट १७ हजार फुटांपर्यंत खाली आलं, ज्यामुळे विमानावरील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. मात्र, अशा परिस्थितीतही स्मित मच्छार यांनी धैर्य दाखवलं आणि हे विमान सौदी अरेबियामध्ये सुखरूप उतरवलं. त्यामुळे १८० प्रवाशांचे प्राण वाचले. सध्या या विमानातील घटनेदरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मच्छार यांचा इस्रायलकडून सन्मान होणार
‘फ्लायदुबई’ विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांचा इस्रायलकडून विशेष सन्मान केला जाणार असल्याची घोषणा भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझार यांनी केली आहे. हवेत असताना विमानात झालेल्या प्राणघातक हल्ल्यादरम्यान कॅप्टन स्मित यांनी दाखवलेलं धैर्य, प्रसंगावधान आणि निर्धार यामुळेच १८० प्रवाशांचे प्राण वाचले, असं सांगत अझार यांनी स्मित यांचा ‘खरा नायक’ असा उल्लेख केला.
