अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राज्याच्या गृह विभागानं देखील याची दखल घेतली आहे. या धमकी प्रकरणामागे लॉरेन्स बिष्णोई गँगचा सहभाग असल्याचा संशय गृह विभागाला आहे. या नंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या घरी जाऊन चौकशी केली. सिद्धू मुसेवालाप्रमाणे मारुन टाकू धमकी दिल्यानंतर सलमान खानने प्रतिक्रिया दिली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, “मला हे पत्र मिळालेले नाही. माझ्या वडिलांना हे पत्र मॉर्निंग वॉकवर असताना मिळाले. आजकाल माझे कोणाशीही वैर नाही. माझ्याकडे कोणावरही संशय घेण्याचे कोणतेही ठोस कारण नाही. तसेच माझा अलीकडे कोणाशीही वाद झालेला नाही. कोणताही धमकीचा कॉल किंवा संदेश आलेला नाही,” असे सलमानला पोलिसांना सांगितले.

धमकीचं पत्र पाठवण्याआधी सलमानच्या घराची रेकी; विश्वास नांगरे पाटील पोहोचले गृहमंत्र्यांच्या भेटीला, संशयाची सुई…

सलमानचा सिद्धू मुसेवाला करण्याची धमकी

५ जून रोजी सलीम खान यांना त्यांच्या घराच्या आवारामध्ये एक धमकीचं पत्र मिळालं होतं. या पत्रामध्ये ‘सलमान खानचाही सिद्धू मुसेवाला करू’ अशा आशयाची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी वांद्रे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास आणि इतर महत्त्वाची माहिती नांगरे-पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आज दिली. सलमान खानला धमकी देण्यामागे लॉरेन्स बिष्णोई गँगचा हात असल्याचा संशय गृहविभागाला असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

सलमान खानला बिष्णोई गँगनं दिली धमकी? म्होरक्याच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती!

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला बिष्णोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिष्णोई याची चौकशी केली. सलमान खानला धमकी दिल्यासंदर्भात त्यांनी लॉरेन्सकडे विचारणा केली असता आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं लॉरेन्सने त्यांना सांगितलं आहे.

“मला काही माहिती नाही”

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई गँगचाच हात असल्याचा संशय सपास यंत्रणांना आहे. बिष्णोई गँगने याआधी देखील सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, “सलमान खानला धमकी कुणी दिली, याविषयी मला काही माहिती नाही”, असं लॉरेन्स बिष्णोईने सांगितल्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे. नेमकी सलमान खानला धमकी दिली कुणी? यासंदर्भात मुंबई पोलीस सखोल तपास करत आहेत.