Salman Khan 7 Dogs Trailer Release Sanjay Dutt Hollywood Debut : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा आता हॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण करणार आहे. अनेक दशके हिंदी सिनेविश्व गाजवल्यानंतर आता सलमान आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये झळकणार आहे. ‘7 Dogs’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा सिनेमा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे यामध्ये सलमान खान व संजय दत्त झळकणार आहेत. सलमान खानने ‘७ डॉग्स’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

सलमान खानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या ‘७ डॉग्स’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये भाईजान व संजय दत्त यांची जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली आहे. हिंदीमध्ये हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हॉलीवूडचा हा सिनेमा क्राइम, थ्रिलर आणि अमली पदार्थांची तस्करी यावर आधारित असल्याचे ट्रेलरवरून लक्षात येतेय. जबरदस्त ॲक्शन असलेल्या या सिनेमामध्ये ज्यावेळी भारतीयांबद्दल विचारले जाते, तेव्हा सलमान खान व संजय दत्त यांची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. संजय दत्त अॅक्शन सीन करताना दिसून आला आहे.

‘७ डॉग्स’ कधी होणार रिलीज?

या हॉलीवूड ‘७ डॉग्स’ सिनेमाचे दिग्दर्शन आदिल एल अर्बी आणि बिलाल फलाह यांनी केले आहे. चित्रपटाची कथा तुर्की अल अलशिख यांनी लिहिली असून, पटकथा मोहम्मद अल-दबाह यांनी लिहिली आहे. ‘७ डॉग्स’ची निर्मिती इव्हान अॅटकिन्सन, मोहम्मद हिलाली आणि सायरस पटेल यांनी केली आहे. हा सिनेमा भारतामध्ये येत्या २१ ऑगस्ट रोजी हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सलमान खान व संजय दत्तचे हॉलीवूडमध्ये पदार्पण

‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने त्याच्या पहिल्या हॉलीवूड चित्रपटाबाबत मत व्यक्त केले होते. तो म्हणालेला, “‘7 Dogs’ हा चित्रपट प्रत्येकाने मोठ्या पडद्यावर पाहावा असा आहे. चित्रपटामध्ये अत्यंत भव्य असे जग निर्माण करण्यात आले असून जबरदस्त अॅक्शन दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचे स्वरूप अतिशय भव्य असून लेखक तुर्की व त्याच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. तसेच दिग्दर्शक आदिल आणि बिलाल यांनी आंतरराष्ट्रीय ॲक्शन चित्रपट बनवण्याचा त्यांचा अनुभन वापरला आहे.

यामध्ये सलमान खान व संजय दत्त यांच्यासह इजिप्शियन अभिनेते करीम अब्देल अझीझ आणि अहमद एझ, तसेच मोनिका बेलुची आणि जियानकार्लो एस्पोसिटो यांसारखे आंतरराष्ट्रीय कलाकार झळकणार आहेत, त्यामुळे या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. सलमान खान पहिल्यांदाच हॉलीवूड सिनेमामध्ये झळकणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या २१ ऑगस्ट रोजी ‘७ डॉग्स’ सिनेमा भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.