नुकताच अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) ‘अंतिम’ हा चित्रपट (Antim movie) प्रदर्शित झालाय. या चित्रपटातील सलमानची पोलीस अधिकाऱ्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरलेली दिसत आहे. यासाठी सलमान खान देखील जोरदार प्रमोशन करत आहे. चाहत्यांना भेटण्यासोबतच विविध मुलाखती आणि वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्याचा त्याने सपाटाच लावलाय. याच दरम्यान एका मुलाखतीत सलमानने आपल्या आजोबांविषयी मोठा खुलासा केलाय. “माझे आजोबा देखील इंदौरचे पोलीस उपमहानिरीक्षक होते, पण वडील ९ वर्षांचे असतानाच त्यांचा मृत्यू झाला,” अशी हळवी आठवण सलमानने सांगितली.

सलमान खान म्हणाला, “माझे आजोबा अब्दुल राशिद खान देखील एक पोलीस अधिकारी होते. ते मध्यप्रदेशमधील इंदौरमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) होते. माझे वडील सलिम खान ९ वर्षांचे असतानाच आजोबांचा मृत्यू झाला.”

“कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका सर्वाधिक आवडली?”

आतापर्यंत निभावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेपैकी कोणती भूमिका सर्वाधिक आवडली या प्रश्नावर सलमानने उत्तर दिलं. सलमान म्हणाला, “मी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्व भूमिका हा अभिनय आहे. किकमध्ये माझी भूमिका नंतर पोलीसवाल्याची असल्याचं समोर येतं. त्यामुळे मी अशी तुलना करू शकत नाही. त्यामुळे मला अजून माझा आवडता पोलीस अधिकारी भेटला नाही.”

“आजोबा हेच आवडते पोलीस अधिकारी”

“आवडता पोलीस अधिकारी अद्याप भेटला नाही, पण माझे आजोबा अब्दुल राशिद माझे आवडते पोलीस अधिकारी आहेत. ते माझे वडील ९ वर्षांचे असतानाच आम्हाला सोडून गेले. तेव्हा ते मध्य प्रदेशमध्ये इंदौरचे डीआयजी होते,” असं सलमान खानने सांगितलं.

हेही वाचा : …म्हणून सलमानने अजुनही केले नाही लग्न; आयुष शर्माने सांगितले कारण

सलमान खानने बहिणीच्या पतीविषयी म्हणजे अंतिम चित्रपटातील अभिनेता आयुष शर्माविषयी देखील काही किस्से सांगितले. या चित्रपटात आयुषने खूप मेहनत घेतली. आयुषने या चित्रपटात स्क्रिनवर जे दिसणं आवश्यक होतं ते सर्व केलं. त्याने चित्रपटातील क्रोधाचे सीनही उत्तर केल्याचं त्यानं सांगितलं. तसेच आयुषचं एकूणच काम कौतुकास पात्र असल्याचंही सलमान म्हणाला.