बॉलिवूडचा ‘सुलतान’ अर्थात सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ २२ डिसेंबरला प्रदर्शित झाला आणि फक्त चार दिवसांतच त्याने तुफान कमाई केली. सलमान- कतरिनाच्या या चित्रपटाने चार दिवसांत १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा असली तरी सध्या सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर नेटिझन्सचं विशेष लक्ष वेधून घेत आहे.

सलमानच्या बॉडीचे लाखो प्रशंसक आहेत, परंतु ही बॉडी खरी नसून नकली असल्याचा खुलासा या व्हिडिओतून झाला आहे. चित्रपटांसाठी व्हिज्युअल इफेक्ट्स देणाऱ्या व्हीएफएक्स स्टुडिओच्या एका व्हिडिओतून हे स्पष्ट होत आहे. ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सिक्वल आहे. हा व्हिडिओ ‘एक था टायगर’ चित्रपटाच्या वेळीचा आहे.

व्हिडिओमध्ये सलमान जेव्हा शर्ट काढतो तेव्हा त्याच्या सिक्स पॅकऐवजी त्याची खरी बॉडी दाखवण्यात आली आहे. त्यानंतर व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून सिक्स पॅक अ‍ॅब्स बॉडीत बदल करण्यात आला आहे.

वाचा : …म्हणून सारा- इब्राहिम तैमुरच्या वाढदिवसाला गैरहजर

व्हीएफएक्स स्टुडिओने युट्यूबवर हा व्हिडिओ सर्वांत आधी अपलोड केला होता. प्रसारमाध्यमांमध्ये जेव्हा यासंदर्भातील वृत्त आले तेव्हा कंपनीने त्वरित हा व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकला. मात्र आता ‘टायगर जिंदा है’च्या निमित्ताने हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.