बॉलिवूडचा ‘दबंग’ खान ज्यालाही भेटतो तो त्याचा चाहता होऊन जातो असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अमेरिकन मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता टायरन वूडलीसोबत असंच काहीसं झालंय. काही दिवसांपूर्वी टायरन वूडली भारतात आला होता. यावेळी त्याने सलमानसोबत काही काळ व्यतित केला. यानंतर तो सलमानच्या इतक्या प्रेमात पडलाय की त्याने सलमानसाठी एक विशेष ट्विट केलंय. ट्विटरवर टायरनने एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये तो सलमानचा उल्लेख करताना दिसतोय. या व्हिडिओतून टायरनने सलमानचे आभार मानले आहेत.

टायरनचा हा व्हिडीओ सलमाननंही ट्विटरवर शेअर करत त्याला टॅग केलंय. सलमानने या ट्विटमध्ये म्हटले की, ‘माझ्यासाठी हे शब्द वापरल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या आजच्या फाइटसाठी शुभेच्छा. देवाचा आशिर्वाद तुझ्यावर कायम राहो!’ हा टायरन नेमका कोण हे अद्याप तुमच्या लक्षात आलं नसेल तर सलमानचा ‘सुलतान’ हा चित्रपट आठवा. या चित्रपटात टायरनने सलमानसोबत स्क्रीन शेअर केली. टायरनने रेसलरची भूमिका साकारली होती.

सलमान काही दिवसांपूर्वीच मोरोक्कोत आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून भारतात परतला आहे. लवकरच तो ‘बिग बॉस’च्या अकराव्या सिझनच्या प्रोमोचं शूटिंग करणार आहे.