सुभाष घईंचा ‘म.म’ भाग्याचा म्हणून कोलकात्याच्या इंद्राणी मुखर्जीची ‘मिष्टी’ झाली आणि घईंच्या चित्रपटाची नायिका होण्याची संधी तिला मिळाली. घईंना मात्र हा म.म ‘मिष्टी’चा तिकीटबारीवर फळला नाही. मिष्टीची प्रमुख भूमिका असलेला सुभाष घई दिग्दर्शित ‘कांची’ हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला इतक्या दारूण पद्धतीने आपटला. पण, मिष्टीला मात्र घईंचा ‘कांची’ फळला असून आता ती सलमानची नायिका बनते आहे.
आपल्या चित्रपटांच्या बाबतीत नायिकांची नावे ‘म’वरूनच असली पाहिजेत, असा पहिल्यापासून सुभाष घईंचा आग्रह राहिला आहे. माधुरी, मनिषा, महिमा हा ‘म’काराचा महिमा इतकी वर्ष झाली तरी घईंच्या मनातून गेलेला नाही. त्यामुळे इतक्या वर्षांनी दिग्दर्शक म्हणून नव्या चित्रपटाला सुरुवात करतानाही त्यांनी इंद्राणीला ‘मिष्टी’ हे नाव देऊन टाकले. पण, शोमन सुभाष घईंच्या दिग्दर्शनाचा करिश्मा ‘कांची’मध्ये कुठेही दिसला नाही. मिष्टीवरही चांगलीच टीका झाली. पण, पहिला चित्रपट सपशेल आपटूनही केवळ घईंच्या कृपेमुळे दुसऱ्याच चित्रपटात सलमानची नायिका म्हणून मिष्टी चमकणार आहे. घईंनी मिष्टीबरोबर तीन चित्रपटांचा करार केला आहे. आणि त्यांच्या आगामी चित्रपटाचा नायक सलमान खान आहे. त्यामुळे साहजिकच नायिकेची भूमिका मिष्टीच्या वाटय़ाला आली आहे. इतक्या कमी वेळात सलमानची नायिका होण्याची संधी आजवर फक्त सलमानने निवडलेल्या अभिनेत्रींनाच मिळालेली आहे. मिष्टीला मात्र घईंमुळे दुसरा चित्रपट आणि तोही सलमानबरोबर अगदी सहजी मिळाला आहे. तिनेही ‘कांची’च्या बाबतीत झालेली टीका दूर ठेवून नव्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे.