अभिनयासोबत बॉलिवूडचा ‘दबंख’ खान अर्थातच सलमानच्या गायन कौशल्याचेही असंख्य चाहते आहेत. ‘मै हूँ हिरो तेरा’ या सलमानच्या आवाजातील गाण्याची क्रेझ अजूनही कायम आहे. आता गायनासोबतच सलमान गीतकारसुद्धा झाला आहे. स्वत:च्याच आगामी चित्रपटासाठी त्याने एक गाणं लिहिल्याचं समजतंय.

हा चित्रपट आहे आगामी ‘रेस ३’. रमेश तौरानी निर्मित या चित्रपटाची सध्या अबुधाबीत शूटिंग सुरू आहे. चित्रपटाच्या टीमला कथेच्या गरजेनुसार एक रोमॅण्टिक गाणं हवं होतं. त्याचवेळी सलमानने आपणही एक गाणं लिहिल्याचं सांगितलं. त्याने गाण्याच्या ओळी वाचून दाखवल्यानंतर त्या सर्वांनाच फार आवडल्या. अखेर हेच गाणं निश्चित करायचं निर्मात्यांनी ठरवलं.

‘आम्हाला जसं गाणं अपेक्षित होतं, अगदी तसंच ते लिहिलं आहे,’ अशी प्रतिक्रिया निर्माता तौरानी यांनी दिली. सलमानवरच चित्रीत केलेल्या या गाण्याला विशाल मिश्राने संगीतबद्ध केलं असून रेमो डिसूझाने याची कोरिओग्राफी केली आहे.

वाचा : ‘रेखा माँ’कडून ऐश्वर्याला भावनिक पत्र

रेमो डिसूझा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून यामध्ये सलमानसोबतच जॅकलिन फर्नांडिस, डेझी शाह, पूजा हेगडे आणि बॉबी देओल महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर ‘रेस ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा ‘फन्ने खान’ हा चित्रपटदेखील त्याचवेळी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफीसवर या दोघांच्या चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.