Samantha Ruth Prabhu Pregnancy Surprise for Raj Nidimoru : दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही लवकरच आई होणार आहे. यापूर्वी तिने गरोदरपणातील अनुभव आणि भावना व्यक्त केल्या होत्या. समांथा सध्या आई होण्याचा खास प्रवास अनुभवत असून याचे फोटो ती शेअर करत असते. पण, समांथाची प्रेग्नेन्सी ही तिच्यासाठी व तिचा पती राज निदिमोरू यांच्यासाठी सरप्राइज असल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे.
समांथाने ‘टीएचआर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैवाहिक नात्याबद्दल आणि गरोदरपणाबद्दल सांगितले. लग्नानंतर कोणतेही मूल होऊ न देण्याबद्दल समांथा व राज यांनी मनाची तयारी केली होती. गरोदर राहण्यापूर्वी त्यांना कोणतेही अपत्य नसले असते तरी चालणार होते. याबाबत समांथा म्हणाली, “मी आयुष्यात अशा टप्प्यावर पोहोचले होते की, जिथे मला आणि राजला मुलं झाली नाहीत तरी आम्ही समाधानी होतो. कदाचित मुलं होतील किंवा होणार नाहीत, यासाठी मी तयार होते. राजनेही हे स्वीकारलं होतं. त्यानंतर मी अचानक गरोदर राहिले, त्यामुळे हे आमच्यासाठी एक सरप्राइज होतं.”
समांथा रूथ प्रभूला तिच्या गरोदरपणाबद्दल कधी समजले?
पुढे समांथाने तिला ती गरोदर असल्याचे कधी समजले याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली, “मी ‘माँ इंटी बंगारम’ या ‘थस्सडिया’ या गाण्याचं शूटिंग करत होते, त्याच दिवशी मला मी गरोदर असल्याचे समजले होते. त्या दिवशी माझी थोडी तब्येत ठीक नव्हती आणि त्याच परिस्थितीत मला गाण्याच्या स्टेप्स करायच्या होत्या. गाण्याच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मला गरोदर असल्याचे समजले. पण, आता मी या नव्या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे. बाळ झाल्यानंतर पूर्ण आयुष्य बदलतं, असे मला खूप जण सांगतात. मला वाटतं, या सर्व बदलांसाठी आता माझ्या मनाची तयारी झाली आहे.”

मला नेहमीच आई व्हायचं होतं – सामंथा
यापूर्वी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत समांथाने आई होण्याच्या नव्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली, “माझ्यासाठी हा नवीन आणि खूप उत्साह देणारा अनुभव आहे. पण, मी या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. मला नेहमीच आई व्हायचं होतं, त्यामुळे या प्रवासासाठी मी माझं सर्वस्व देईन. मी प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत आहे, या क्षणासाठी मनापासून कृतज्ञ आहे. बाळ येणार असल्याने आयुष्य जगण्याचा नवा उद्देश मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे.”

समांथा रूथ प्रभूने डिसेंबर २०२५ मध्ये कोईम्बतूर येथील ‘इशा योग केंद्रा’तील ‘लिंग भैरवी’ मंदिरात दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केलं. ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम करताना या दोघांची ओळख झाली होती. यापूर्वी समांथाने तिचा एक्स पती नागा चैतन्य याच्यासह २०२१ मध्ये घटस्फोट घेतला होता. यानंतर आता समांथा रूथ प्रभू गरोदर असून येत्या डिसेंबर महिन्यामध्ये ती गोंडस बाळाला जन्म देणार आहे.
