Samantha Ruth Prabhu confirms Pregnancy: दाक्षिणात्य आणि बॉलीवूड सिनेसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम देत अखेर समांथा रुथ प्रभूने ती गरोदर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिच्या आगामी ‘मा इँटी बंगारम’ (Maa Inti Bangaram) या चित्रपटाच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना तिने ही गूड न्यूज शेअर केली. सध्या हातामध्ये असलेले प्रोजेक्ट्स पूर्ण केल्यानंतर ती थेट मॅटर्निटी लीव्हवर जाणार आहे. समांथा आणि तिचे पती राज निदिमोरू यांच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर समांथा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘मा इँटी बंगारम’च्या सक्सेस सेलिब्रेशनच्या काही व्हिडीओ क्लिप्समध्ये समांथा रूथ प्रभूचा बेबी बंप दिसत होता. त्यानंतर समांथा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता स्वतः समांथाने या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे. समांथा म्हणाली, “माझ्या सध्याच्या परिस्थितीमुळे ‘मा इँटी बंगारम’ चित्रपटानंतर मला एक छोटा ब्रेक घ्यावा लागेल. मला मॅटर्निटी लीव्ह घ्यावी लागणार आहे. त्यानंतर मी पुन्हा एका नवीन चित्रपटातून माझ्या चाहत्यांच्या भेटीला येईन.”

समांथा डिसेंबरमध्ये देणार बाळाला जन्म

चित्रपटाच्या टीममधील सूत्रांनी ‘स्क्रीन’ला दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या यशाबरोबरची ही आनंदाची बातमी देण्याची योग्य वेळ होती. समांथा डिसेंबर २०२६ मध्ये बाळाला जन्म देणार आहे, मात्र त्यावेळी अभिनेत्रीने स्वतः या वृत्तावर शिक्कामोर्तब केले नव्हते. “समांथा व राज दोघेही सध्या खूप आनंदी आहेत. खासकरून समांथा, कारण तिला नेहमीच आई व्हायचं होतं.”

‘मा इँटी बंगारम’ चित्रपटाची दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी हिनेदेखील समांथाच्या प्रेग्नन्सीबद्दल ‘सिनेमा एक्सप्रेस’शी बोलताना प्रतिक्रिया दिली. “तिच्या प्रेग्नन्सीबद्दल अतिशय चांगल्या वेळेत समजलं, कारण आपला ‘मा इँटी बंगारम’ हा चित्रपटही हिट ठरला आहे.” समांथा या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला आली होती तेव्हा तिचा बेबी बंप पाहून तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. बेबी बंप न लपवण्याचा निर्णय तिने जाणूनबुजून घेतला होता असंही नंदिनीने सांगितलं.

समांथा रूथ प्रभू व राज निदिमोरूचं लग्न

समांथा रूथ प्रभूने डिसेंबर २०२५ मध्ये कोईम्बतूर येथील ‘इशा योग केंद्रा’तील ‘लिंग भैरवी’ मंदिरात अत्यंत खासगी पद्धतीने चित्रपट दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केलं. ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम करताना या दोघांची ओळख झाली होती. यात समांथाने साकारलेल्या ‘राजी’ या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. त्यानंतर २०२४ मधील ‘सिटाडेल: हनी बनी’ या सीरिजमध्येही राज व समांथाने पुन्हा एकत्र काम केलं.

समांथा व राज यांचे पहिले घटस्फोट

दरम्यान, राज व समांथा दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. समांथाचं पहिलं लग्न अभिनेता नागा चैतन्यशी झालं होतं. २०१७ मध्ये लग्न केल्यावर ४ वर्षांनी म्हणजेच २०२१ मध्ये ते विभक्त झाले. तर, राज निदिमोरूचं पहिलं लग्न श्यामली डे हिच्याशी झालं होतं.