Samantha Ruth Prabhu marries Raj Nidimoru : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. समांथाने ‘द फॅमिली मॅन’चा दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केलं. सोमवारी सकाळी ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात एका अत्यंत खासगी समारंभात दोघांनी लग्न केलं. समांथाने लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

समांथा व राज निदिमोरूचं लग्न ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात सकाळी पार पडलं. हा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पडला आणि लग्नात फक्त ३० पाहुणे उपस्थित होते. मंदिराच्या शांत आणि आध्यात्मिक वातावरणात दोघांनी लग्न केलं. समांथाने लग्नात पारंपरिक लाल साडी नेसली होती.

समांथाने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. फोटोत तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहायला मिळतंय. तसेच दोघेही एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत. समांथाने ‘01.12.2025’ असं कॅप्शन देत फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा पोस्ट

समांथा रूथ प्रभू -नागा चैतन्य घटस्फोट

Samantha Ruth Prabhu Naga Chaitanya Divorce: समांथाने पहिलं लग्न अभिनेता नागा चैतन्यशी केलं होतं. दोघांनी २०१७ मध्ये गोव्यात एका भव्य सोहळ्यात लग्नागाठ बांधली होती, पण ४ वर्षांत ते विभक्त झाले. २०२१ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर ३ वर्षांनी नागा चैतन्यने २०२४ मध्ये अभिनेत्री सोभिता धुलीपालाशी दुसऱ्यांदा संसार थाटला. आता नागा चैतन्यच्या लग्नानंतर वर्षभराने समांथाने दुसरं लग्न केलं.

घटस्फोटित आहे राज निदिमोरू

Who is Raj Nidimoru? राज निदिमोरू हा लोकप्रिय दिग्दर्शक आहे. त्याचं पहिलं लग्न श्यामली डे हिच्याशी झालं होतं. श्यामलीपासून राजला एक मुलगी आहे. राजची एक्स पत्नी, श्यामली डे हिने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट केली होती. त्यात “हताश लोक हताश गोष्टी करतात,” असं लिहिलं होतं. राज व श्यामली यांच्या नात्याबद्दल फार माहिती उपलब्ध नाही. पण ते २०२२ मध्ये वेगळे झाल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.