२०२१ मध्ये समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला. आता दोघेही आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. समांथाने दिग्दर्शक राज निदिमोरू याच्याशी, तर नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्याशी लग्न केलं. ते आपापल्या संसारात सुखी आहेत. नुकतेच हे दोघेही एकाच लग्न समारंभाला उपस्थित होते. ‘एशियन सिनेमा’चे निर्माते सुनील नारंग यांची मुलगी सिमरन नारंग हिच्या लग्नाचे रिसेप्शन शनिवारी हैदराबादमध्ये पार पडले. या सोहळ्याला चिरंजीवी आणि नागार्जुन यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. याच कार्यक्रमात समांथा आणि नागा चैतन्य हे देखील आपापल्या जोडीदारांसह पोहोचले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये सामंथा जांभळ्या रंगाच्या सुंदर साडीत आली होती. राजचा हात धरून तिथे येताना तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत होता. एका व्हिडीओमध्ये ती गर्दीत आपल्या पतीचा सुरक्षा रक्षकांना धक्का लागू नये म्हणून त्याची काळजी घेतानाही दिसली. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये नागा चैतन्य आणि शोभिता हे नागार्जुन आणि अमला यांच्याबरोबर रिसेप्शनला आले. शोभिताने सुंदर साडी नेसली होती, तर नागा चैतन्य निळ्या रंगाच्या सूटमध्ये आला होता. आत जाण्यापूर्वी त्यांनी पापाराझींना पोझही दिली.
समांथा व नागा चैतन्य यांची एकमेकांशी भेट झाली की नाही, याचे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ समोर आलेले नाहीत; मात्र चाहत्यांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता दिसून आली. सोशल मीडियावर एका चाहत्याने विचारले, “समांथा आणि नागा चैतन्य एकाच लग्नात भेटले का?” तर दुसऱ्याने लिहिलं, “ते एकमेकांना भेटले असतील का.” एका चाहत्याने कमेंट केली की, “कोणाची नजर नको लागायला, ते आता आपापल्या आयुष्यात आनंदी दिसत आहेत.”
समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचं नातं
२०१० मधील ‘ये माया चेसावे’ या गाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सामंथा आणि चैतन्य अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. ऑक्टोबर २०१७ मध्ये गोव्यात त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतींनी लग्न केलं. मात्र, २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली.
२०२२ मध्ये नागा चैतन्य आणि शोभिता एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या, परंतु त्यांनी कधीही उघडपणे याची कबुली दिली नाही. अखेर डिसेंबर २०२४ मध्ये हैदराबादमधील अण्णापूर्णा स्टुडिओ येथे त्यांचं लग्न पार पडलं. तर, २०२३ मध्ये समांथाने राज निदिमोरू याच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केल्यापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली होती. डिसेंबर २०२५ मध्ये या दोघांनी कोईम्बतूरमध्ये लग्न केलं.
नागा चैतन्यच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा ‘थंडेल’ चित्रपटात दिसला होता आणि आता त्याचा ‘वृषकर्मा’ हा सोशिओ-फँटसी चित्रपट येत आहे. तर शोभिताने यावर्षी प्राईम व्हिडीओवरील ‘चीकटीलो’ (Cheekatilo) या चित्रपटात काम केलं होतं. समांथाने २०२४ मध्ये वरुण धवनबरोबर ‘सिटाडेल: हनी बनी’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. लवकरच ती ‘माँ इंटी बंगाराम’ आणि ‘रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम’मध्ये दिसणार आहे. तर राज निदिमोरूने डीके सोबत ‘सिटाडेल: हनी बनी’चे दिग्दर्शन केले होते.
