Samantha Ruth Prabhu Pregnant: दाक्षिणात्य व बॉलीवूड सिनेसृष्टी गाजवणारी सुपरस्टार अभिनेत्री समांथा रूथ प्रभू लवकरच आई होणार आहे. ती गरोदर असल्याचे सामंथाने जाहीर केले असून या आनंदाच्या बातमीमुळे तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. समांथाच्या ‘मा इँटी बंगारम’ या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे एकीकडे सिनेमाला मिळणारे यश आणि वैयक्तिक आयुष्यातही ती गरोदर असल्याने तिच्यासाठी हा काळ विशेष आनंददायी ठरत आहे. पहिल्यांदाच आई होत असलेल्या समांथाने मातृत्वाबाबत तिचे मत व्यक्त केले आहे. ती या क्षणाची बऱ्याच काळापासून आतुरतेने वाट पाहत असल्याचे तिने सांगितले आहे.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत समांथाने आई होण्याच्या नव्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली, “हा माझ्यासाठी नक्कीच नवा आणि खूप उत्साह देणारा अनुभव आहे. पण मी या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. मला नेहमीच आई व्हायचं होतं. त्यामुळे या प्रवासासाठी मी माझं सर्वस्व देईन.”
प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिकतीये – समांथा
या नव्या टप्प्यामुळे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलल्याचं समांथाने सांगितलं. ती म्हणाली, “मी आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमीच प्रचंड उत्साही राहिले आहे. पण आता माझ्यामध्ये एक वेगळी ताकद आणि आयुष्याचं जगण्याचा उद्देश मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. या प्रवासाची मला खूप उत्सुकता आहे. मी प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत आहे, या क्षणासाठी मनापासून कृतज्ञ आहे आणि पुढे आयुष्यात जे बाळ येणार आहे, त्याच्या स्वागतासाठी आणि त्याला स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करत आहे.”
गेल्या महिन्यात ‘मा इँटी बंगारम’ सिनेमाच्या यशानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात समांथाने ती गरोदर असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले होते. यावेळी तिने सध्या सुरू असलेले प्रोजेक्ट्स पूर्ण झाल्यानंतर थोड्या वेळेसाठी मॅटर्निटी लीव्ह घेणार असल्याचेही सांगितले. ती म्हणाली, “‘माझ्या सध्याच्या परिस्थितीमुळे ‘मा इँटी बंगारम’ चित्रपटानंतर मला एक छोटा ब्रेक घ्यावा लागेल. मला मॅटर्निटी लीव्ह घ्यावी लागणार आहे. त्यानंतर मी पुन्हा एका नवीन चित्रपटातून माझ्या चाहत्यांच्या भेटीला येईन.”
समांथा डिसेंबरमध्ये देणार बाळाला जन्म
समांथा रूथ प्रभूने डिसेंबर २०२५ मध्ये कोईम्बतूर येथील ‘इशा योग केंद्रा’तील ‘लिंग भैरवी’ मंदिरात अत्यंत खासगी पद्धतीने चित्रपट दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केलं. ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम करताना या दोघांची ओळख झाली होती. यापूर्वी समांथाने तिचा एक्स पती नागा चैतन्य याच्यासह २०२१ मध्ये घटस्फोट घेतला होता. यानंतर आता समांथा रूथ प्रभू गरोदर असून येत्या डिसेंबर महिन्यामध्ये ती गोंडस बाळाला जन्म देणार आहे.
