Samantha Ruth Prabhu Fitness Secrets: आरोग्य निरोगी राहावे यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी चौरस आहार, व्यायाम व पुरेशी झोप या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र, अनेकदा योग्य मार्गदर्शनाचीदेखील गरज असते. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरते.
अनेकदा कलाकार त्यांच्या चांगल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल करतात. उत्तम जीवनशैलीसाठी ते प्रयत्न करतात. निरोगी आरोग्यासाठी ते काय करतात, याबद्दलही ते अनेकदा व्यक्त होतात.
आता लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने तिच्या दिनचर्येबद्दल खुलासा केला होता. सकाळच्या वेळेत ती ८ गोष्टी करते. त्याला तिने ८ स्टेप्स पॉवर मॉर्निंग, असे म्हटले आहे. समांथाने नुकतेच तिच्या ८ स्टेप्स पॉवर मॉर्निंग रुटिनबद्दल खुलासा केला. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ती म्हणाली, “जर सकाळची सुरुवात तुमची चांगली झाली असेल, तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो, असा माझा विश्वास आहे.”
पुढे ती म्हणाली, “मी वेगवेगळे रुटिन करून पाहिले आहेत. त्यानंतर मला माझ्यासाठी एक रुटिन सापडले आहे. त्याला मी ‘पॉवर मॉर्निंग’, असे म्हणते. जर तुम्ही सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने करीत असाल आणि तरीही पोटावरील चरबी कमी होत नसेल किंवा सकाळी उठताना त्वचेवर सूज जाणवत असेल, तर तुम्हाला तुमच्या सकाळच्या दिनचर्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही उठता, तेव्हा तुमचे ताणाशी संबंधित हार्मोन्स (stress hormones) जास्त असतात. सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय करता हे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही लगेचच तुमचा फोन, बातम्या, काम किंवा ईमेल्स पाहायला सुरुवात केली, तर त्यामुळे तुमचा ताण वाढतो.”
समांथा रुथ प्रभू सकाळी उठल्यानंतर करते ‘या’ आठ गोष्टी
पुढे तिने लिहिले, मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे, ज्याचा मला खूप फायदा झाला. त्या तुम्ही सलग २१ दिवस करा.
१. सकाळी उठल्यानंतर सुरुवातीच्या १ तासात फोन बघू नका.
२. ५ मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा.
३. उठल्यानंतर सकाळच्या सूर्यप्रकाशात बसा.
४. कोमट पाण्यात लिंबू, हळद, ॲपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) आणि थोडंसं ऑरगॅनिक ऑलिव्ह ऑईल घालून, ते पाणी तुम्ही पिऊ शकता..
५. नाश्त्यामध्ये असे पदार्थ खा की, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर स्थिर राहील आणि तुम्हाला दिवसभर गोड खाण्याची इच्छा होणार नाही.
६. ११ वाजण्याच्या आधी व्यायाम करा.
७. चहा किंवा कॉफी नाश्त्यानंतर प्या.
८. दिवसभरात तुम्हाला काय साध्य करायचं आहे, ते ठरवा. एखादे छोटेसे उद्दिष्ट असले तरी त्याबद्दल जाणीवपूर्वक विचार करा आणि ते लिहून ठेवा.
शेवटी समंथा असेही म्हणाली की, मला या ‘पॉवर मॉर्निंग रुटिन’चा फायदा झाला. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे, तर ती लवकरच मां इन्ती बंगाराम या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
