Samantha Ruth Prabhu life with Raj Nidimoru : अभिनेत्री समांथा रूथ प्रभूने २०२१ मध्ये नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला. या निर्णयांना सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यानंतर तिने तिला म्युकर मायकोसिस नावाचा आजार असल्याचं सांगितलं. या आजारामुळे तिने अभिनयातून ब्रेक घेतला. अलीकडच्या काही महिन्यांपासून समांथा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर ४ वर्षांनी डिसेंबर २०२५ मध्ये समांथाने लोकप्रिय दिग्दर्शक राज निदिमोरू याच्याशी दुसरं लग्न केलं. आता समांथाने तिच्या पहिल्या नात्याचा अनुभव सांगितला. तसेच राजबरोबरच्या नात्याने तिला कसं बदललं तेही नमूद केलं.

नागा चैतन्यबरोबरच्या घटस्फोटाबद्दल समांथा म्हणाली…

समांथा रुथ प्रभू ‘व्होग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “गेल्या काही वर्षात माझ्यात खूप मोठे बदल झाले. जेव्हा तुम्ही प्रसिद्ध असता, लोकांच्या नजरेसमोर असता, तेव्हा सतत एक भीती असते. ती म्हणजे स्वतःची फजिती होण्याची किंवा ट्रोल होण्याची. लोक काय म्हणतील या भीतीने आपण सतत आपले स्टेटस जपण्याचा प्रयत्न करतो. कारण जेव्हा तुम्ही अपयशी होता, तेव्हा संपूर्ण जग ते पाहत असतं.”

घटस्फोटाबद्दल समांथा म्हणाली, “जेव्हा माझा घटस्फोट झाला, तेव्हा मी स्वतःला पूर्णपणे कोंडून घेतलं होते. मला वाटलं नव्हतं की मी पुन्हा कधी कोणावर अवलंबून राहू शकेन. पण मी प्रेम आणि मैत्री स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार केलं. राजबरोबरच्या नात्यामुळे मी एक अधिक चांगली व्यक्ती बनले आहे.”

समांथाच्या मते, तिच्यात झालेला हा बदल तिच्या मित्र-मैत्रिणींनाही जाणवत आहे. एका जुन्या मैत्रिणीचा किस्सा सांगताना समांथा म्हणाली, “काही दिवसांपूर्वी मी एका जुन्या मैत्रिणीला भेटले. त्यानंतर तिने मला एक व्हॉइस मेसेज पाठवला आणि म्हटलं की, ‘खूप काळानंतर तुला पाहून असं वाटलं की तू आता मोकळेपणाने जगतेय.’ आता मला कोणासमोरही कोणताही दिखावा करण्याची गरज वाटत नाही.”

‘आम्ही एक इरिटेटिंग कपल आहोत’

राजबरोबरच्या नात्याबद्दल समांथा म्हणाली, “राज आणि मी खरंच त्या ‘इरिटेटिंग’ जोडप्यांसारखे आहोत, जी सगळी कामं एकत्रच करतात. आम्ही एकत्र काम करतो, एकत्र खेळतो आणि आमच्या ट्रेनरबरोबर व्यायामही एकत्रच करतो. आम्हाला हे सगळं खूप आवडतं. मला जर एका दिवसासाठी जरी बाहेरगावी जायचं असेल, तरी मला खूप त्रास होतो. हा फक्त सुरुवातीचा ‘हनिमून फेज’ आहे, असं मला वाटत नाही, कारण आता खूप काळ उलटून गेला आहे.”

एकत्र काम करताहेत राज व समांथा

समांथा व राज ‘मां इंटी बंगारम’ (Maa Inti Bangaaram) या तेलुगू चित्रपटात एकत्र काम करत आहे. राज निर्माता आहे, तर समांथा मुख्य अभिनेत्री आणि निर्माती आहे. राजबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत समांथा म्हणाली, “एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला कोणत्याही भूमिकेत जाण्यासाठी मोकळीक हवी असते. दिग्दर्शकाला आपण मूर्ख किंवा काम करण्यास असमर्थ वाटू का, याची भीती मनात असते. राजच्या बाबतीत बोलायचं तर, आता खूप उशीर झाला आहे. आता मी त्याच्यासमोर स्वतःची कितीही फजिती करून घेतली, तरी तो मला सोडून जाऊ शकत नाही.”

समांथाला इंडस्ट्रीत १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्टारडमबरोबर येणारी टीका आणि ट्रोलिंगबद्दल ती म्हणाली, “मी कौतुक किंवा टीका, कशालाच खूप गांभीर्याने घेत नाही. जेव्हा लोक मला ‘परी’ म्हणतात तेव्हाही नाही आणि जेव्हा मला ‘जगातील सर्वात वाईट व्यक्ती’ ठरवतात तेव्हाही नाही. १६ वर्षे हा खूप मोठा काळ आहे, इतक्या वर्षांनी मला या गोष्टींचा फरक पडत नाही.”

दरम्यान, समांथाने १ डिसेंबर २०२५ रोजी राज निदिमोरूशी ईशा योग केंद्रात अतिशय साध्या पद्धतीने ‘भूत शुद्धी विवाह’ विधीद्वारे लग्न केलं. दुसरीकडे, सामंथाचा माजी पती नागा चैतन्य याने डिसेंबर २०२४ मध्ये अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. नागा चैतन्य व समांथा दोघेही आपापल्या वैयक्तिक आयुष्यात आनंदी आहेत.