Samantha Ruth Prabhu Morning Routine : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समांथा रूथ प्रभू. अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी समांथा तिच्या फिटनेससाठीसुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा तिच्या फिटनेसचे फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.

अशातच आता समांथाने तिच्या सकाळच्या दिनक्रमाबद्दल (Morning Routine) एक खास माहिती शेअर केली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिची “पॉवर मॉर्निंग” रूटीन सांगितली आहे. ही साधी पण शास्त्रीय आधार असलेली सवय असून त्यामुळे तिची ऊर्जा वाढते, ताण कमी होतो आणि आरोग्यात सकारात्मक बदल होतो, असं ती सांगते.

सकाळी उठल्यानंतर एक तास वापरू नका फोन

सकाळी झोपून उठल्यानंतर पहिल्या एका तासात मोबाईलपासून दूर राहणं, श्वसन, सकाळचं ऊन घेणं आणि शांतपणे नाश्ता करणं – या सगळ्या सवयी तिच्या दिनक्रमाचा भाग असल्याचे ती सांगते. याबद्दल अभिनेत्री म्हणते, “आपण उठतो तेव्हा शरीरात ताण निर्माण करणारे हार्मोन्स आधीच जास्त असतात आणि जर आपण लगेच फोन, बातम्या किंवा ईमेल पाहायला सुरुवात केली, तर हा ताण दुप्पट होतो,” असं ती सांगते. त्यामुळे ती उठल्यानंतर पहिल्या एका तासात फोन वापरत नाही.

Award Banner

समांथाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. यावेळी तिने सांगितले की, “सकाळची सुरुवात कशी होते, यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. मी अनेक गोष्टी करून पाहिल्यानंतर आता या एका साध्या सूत्रावर आले आहे, जे माझ्यासाठी उत्तम काम करत आहे.” पुढे पोट सुटणे, त्वचेच्या समस्या किंवा सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर येणारी सूज यांसारख्या गोष्टी आपण दिवसाची सुरुवात कशी करतो, याच्याशी संबंधित असू शकतात, असेही तिने नमूद केले.

सकाळी ११ वाजण्यापूर्वी थोडा व्यायाम आवश्यक

समांथा पुढे म्हणते, “हळूहळू आणि शांतपणे श्वास घेतल्यामुळे मेंदूला सुरक्षित असल्याचे संकेत मिळतात, ज्यामुळे शरीर चरबी जाळण्यास मदत करते”. सकाळी ११ वाजण्यापूर्वी थोडा व्यायाम करणं आणि नाश्त्यानंतरच चहा किंवा कॉफी घेणं, हेही तिच्या दिनक्रमाचा भाग असल्याचे ती सांगते. दरम्यान, समांथाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तसेच यावर अनेकजण त्यांच्या विविध प्रतिक्रियादेखील व्यक्त करत आहेत.

दरम्यान, समांथाच्या आगामी कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती सध्या ‘माँ इंती बंगाराम’ आणि ‘रक्त ब्रह्मांड’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. तसेच ती सलमान खानबरोबर एका सुपरहिरो चित्रपटात दिसण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

सूचना – कलाकारांचे डाएट आणि फिटनेस रूटीन हे त्यांच्या कामाचे स्वरूप आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठरवलेले असते. वरील माहिती अभिनेत्रीच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक ठेवण, आरोग्य आणि गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे नवीन आहार किंवा व्यायामाचा प्रकार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.