Samay Raina and Ranveer Allahbadia to Collaborate Again : ‘इंडियाज गॉट लेटेंट’शो मुळे चर्चेत आलेला स्टँडअप कॉमेडियन समय रैना आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ‘समय रैना – स्टिल अलाईव्ह’ व्हिडीओमधून ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमधून समयने वादाला कारणीभूत ठरलेला युट्युबर रणवीर अलाहाबादियावरही अप्रत्यक्ष टीका केली होती.
‘स्टिल अलाईव्ह’मध्ये समयने वादावर प्रतिक्रिया देताना मोठा खुलासा केला. तो म्हणाला की, शोच्या दरम्यान रणवीरने अनेक आक्षेपार्ह कमेंट्स केल्या होत्या, ज्या मी एडिटिंगमध्ये काढून टाकल्या. मात्र, एक जोक राहिला आणि त्यावरूनच मोठा वाद निर्माण झाला. रणवीरने संपूर्ण एपिसोडमध्ये तो वादग्रस्त जोक तब्बल आठ वेळा केला होता.
या वादानंतर नुकतेच एका पापाराझीने रणवीरला समयबद्दल विचारले असता, त्याने “कोण समय?” म्हणत “सध्या माझाच समय (वेळ) सुरू आहे”, असं म्हटलं होतं. यावरून रणवीरला समयचा राग आल्याचा अंदाज काही नेटकऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र, आता समयने रणवीरबद्दल मनात कोणताही राग नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या मोठ्या वादानंतर दोघे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. याबद्दल स्वत: समयनेच माहिती दिली आहे.
इन्स्टाग्रामवरील एका प्रश्नोत्तराच्या सेगमेंटमध्ये एका चाहत्याने समयला रणवीरसाठी काही खास प्लॅन आहे का? असे विचारले. यावर समयने दोघे लवकरच एका प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याचे म्हणाला. तसेच ‘इंडियाज गॉट लेटेंट’चा दुसरा सीझनही लवकरच येणार असल्याचे त्याने सांगितले.

पुढे एका चाहत्याने समयला “इंटरनेटवर पुन्हा एकदा धमाका कर” असे म्हटले, त्यावर समयने ‘३ मे’ ही तारीख जाहीर केली. त्यामुळे आता या दिवशी समय पुन्हा काहीतरी विशेष घेऊन येणार असल्याची शक्यता आहे. ज्याची त्याच्या चाहत्यांसह सर्वांनाच खूप उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, समयच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोच्या वादाबद्दल सांगायचे झाले तर, रणवीर अलाहाबादियाच्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मोठा वाद झाला होता. एका स्पर्धकाशी संवाद साधताना त्याने पालकांबाबत अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली. याप्रकरणी समय रैना, रणवीरसह आशीष चंचलानी आणि अपूर्वा मुखिजा यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
