महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘डिजिटल अरेस्ट’ या विषयावरील सायबर जनजागृती करणारा लघुपट ‘ऑपरेशन 1930’ आणि महाराष्ट्र सायबर अँथमचं (गीत) अनावरण केलं. या कार्यक्रमाला आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, सोनाली बेंद्रे, अभिषेक बॅनर्जी, मंगेश देसाई, सुनिधी चौहान, कॉमेडियन समय रैनासह वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. समयने यादरम्यानचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यावेळी समय नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात…
समय रैनाच्या कृतीने आणि त्याचं भाषण ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. तो म्हणाला, “महाराष्ट्र सायबर आणि माझं नातं अनेक वर्षांपासून आहे…1930 हा नंबर तर मी सेव्ह करून ठेवलाय कारण, अनेकवेळा मला तिथूनच फोन येतो. महाराष्ट्र सायबर सेल विभाग खूप जास्त सक्रिय आहे. तुम्ही US मध्ये असाल किंवा भारतात कुठेही…ते लोक काहीही करून तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज पहिल्यांदा असं झालं असेल की, महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस सकाळी एका कॉमेडियनच्या घरी गेले आणि त्याला घेऊन आले पण, यावेळी त्या कॉमेडियनचा सत्कार करण्यात आला आहे. त्यामुळे थँक्यू सो मच सर!” समयची ही प्रतिक्रिया ऐकून त्याच्या बाजूला बसलेल्या अभिनेता शरद केळकरला हसु अनावर झालं होतं.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समय रैना याचा सत्कार करण्यात आला. यादरम्यान एक गमतीशीर गोष्ट घडली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सत्कार झाल्यावर समयने मुख्यमंत्र्यांसमोर ठेवलेली बिस्किटची प्लेट पाहिली. त्याने लगेच देवेंद्र फडणवीसांना ‘सर, मी यातील एक बिस्किट घेऊ का?’ असं विचारलं. समयच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी लगेच होकार दर्शवला. समय यानंतर बिस्किट घेऊन माघारी गेला. त्याची ही कृती पाहून स्वत: मुख्यमंत्री सुद्धा हसु लागले.
समयाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “द मोस्ट Unexpected collab” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी यावर दिल्या आहेत. समयचा जिवलग मित्र बलराजने यावर “If you wait long enough, Life comes full circle” अशी कमेंट केली आहे.
दरम्यान, सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, CBI किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून, घाबरवून फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाल्यास तातडीने ‘1930’ या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं आहे.
