Samay Raina Still Alive Show World Record: स्टँडअप कॉमेडियन समय रैना हे नाव कायमच चर्चेत राहणार नाव आहे. कधी तो आपल्या विनोदामुळे चर्चेत येत असतो तर कधी त्या विनोदावरून होणाऱ्या वादामुळे. मात्र आता तो चर्चेत येण्यामागचं कारण आहे, त्याने केलेला एक नवीन विक्रम.
समयने यूट्यूबवर ‘स्टिल अलाईव्ह’ या त्याच्या नवीन शोचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. गेल्यावर्षी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’वरून निर्माण झालेला कायदेशीर वाद, आर्थिक ताण आणि लोकांची टीका यावर समयने ‘स्टिल अलाईव्ह’ खुलेपणाने भाष्य केले आहे.
या शोला जगभरातील प्रेक्षकांनी इतका प्रतिसाद दिला आहे की, हा व्हिडीओ जगातील सर्वाधिक पाहिला गेलेला संपूर्ण लांबीचा स्टँड-अप कॉमेडी स्पेशल ठरला आहे. यूट्यूबवर या कॉमेडी स्पेशलने व्हिडीओने ५ कोटी ४३ लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा ओलांडत एक नवीन जागतिक विक्रम बनवला आहे. तसेच या व्हिडीओवर दोन लाखांहून अधिक कमेंट्सही आहेत.
याबद्दल समयने बुधवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये असे म्हटले होते की, “समयने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादाचे रूपांतर एका विक्रमी कमबॅकमधून केले आहे.” इतक्या कमी वेळात एवढे यश मिळवणे हे एका संपूर्ण स्टँड-अप शोसाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जाते.
७ एप्रिल रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झालेल्या या शोने पहिल्या २४ तासांतच २ कोटी २० लाख व्ह्यूज मिळवले होते. नंतर एका आठवड्यातच, व्हिडीओला ४.८ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. याबद्दल बोलताना समय म्हणाला, “‘स्टिल अलाईव्ह’ ही मी आजवर बनवलेली सर्वात प्रामाणिक गोष्ट आहे. या यशाचे सर्व श्रेय त्या प्रेक्षकांना जाते, ज्यांनी कठीण काळातही माझी साथ सोडली नाही.”

दरम्यान, २०२५ मध्ये ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या एका विधानामुळे देशभर वाद निर्माण झाला होता. या वादानंतर समयने आपल्या चॅनेलवरून या शोचे सर्व भाग काढून टाकले होते. ‘स्टिल अलाईव्ह’मध्ये या वादावर बोलताना समयने सांगितले की, तो काळ त्याच्या मानसिक आरोग्यासाठी खूप कठीण होता. रणवीरने त्या भागात आठवेळा तो जोक मारला होता, पण एडिट करताना एकच ठेवला गेल्याने वाद निर्माण झाला, असेही त्याने स्पष्ट केले.
