Sambhavna Seth and husband Avinash Dwivedi welcome twins: काही दिवसांपूर्वी दिव्यांका त्रिपाठी व विवेक दहिया हे जुळ्या मुलांचे पालक झाले. जेव्हा त्यांनी ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली, त्यावेळी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आता दिव्यांका व विवेकनंतर मनोरंजन सृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीने आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

लोकप्रिय अभिनेत्री सरोगसीद्वारे ४५ व्या वर्षी झाली जुळ्या मुलांची आई

अभिनेत्री संभावना सेठ व तिचा पती अविनाश द्विवेदी हे जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले आहेत. एक मुलगा व एका मुलीचे ते पालक झाले आहेत. अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

संभावनाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. काही पोस्टर शेअर करत तिने लिहिले आहे की आम्हाला मुलगा व मुलगी झाली आहे. आम्ही जुळ्या मुलांचे आई-बाबा झालो आहोत. या पोस्टमध्ये आणखी एक फोटो पाहायला मिळतो, ज्यामध्ये तिने व तिच्या पतीने मुलांना हातात घेतल्याचे दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी शेअर केल्यामुळे ते कसे दिसतात, हे मात्र पाहायला मिळत नाही. पुढच्या एका फोटोत अभिनेत्री भावूक झाल्याचे दिसत आहे. तिच्या डोळ्यांत अश्रू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पोस्टच्या शेवटच्या फोटोमध्ये संभावना रडत असून तिचा पती तिला समजावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ही पोस्ट शेअर करताना तिने लिहिले, “यावर्षी दिवाळी लवकर आली आहे. लक्ष्मी व गणेशजी दोघेही घरी आले आहेत; आमची हृदये कृतज्ञतेने भरून आली आहेत.”

अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले, “मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे, अभिनंदन.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “अभिनंदन, तुम्ही या क्षणाची वाट पाहत होता हे आम्ही पाहिले आहे”, आणखी एकाने लिहिले, “हे भावूक करणारे आहे, तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन.” आणखी एकाने लिहिले, “तुमचे अभिनंदन, तुमच्यावर देवाचा आशीर्वाद कायम असू दे”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी संभावना व अविनाश यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करण्याबरोबर यूट्यूबवरदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. या जोडप्याला सरोगसीद्वारे बाळ झाले आहे. लग्नाच्या १० वर्षांनंतर ते आई-बाबा झाले आहेत. याआधी अभिनेत्रीने खुलासा केला होता की आठ वेळा आयव्हीएफ केले होते, मात्र ते यशस्वी झाले नाही. आता सरोगसीद्वारे संभावना सेठ ४५ व्या वर्षी आई झाली आहे, तिचा हा आनंद तिने शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संभावना व अविनाश यांनी ते पालक होणार असल्याचे सांगितले होते.