Sambhavna Seth Pregnancy: मनोरंजन विश्वात सध्या आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. नुकतीच दिव्यांका त्रिपाठीने आई होणार असल्याची बातमी दिल्यानंतर आता ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री संभावना सेठच्या घरातही लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. लग्नाच्या १० वर्षांनंतर आणि अनेक कठीण प्रसंगांचा सामना केल्यानंतर संभावना आणि तिचा पती अविनाश द्विवेदी यांनी सोशल मीडियावर ही ‘गुड न्यूज’ शेअर केली आहे. सरोगसीच्या माध्यमातून हा प्रवास सुरू असल्याचे सांगताना हे जोडपे अत्यंत भावुक झाले आहे.
अनेक वेळा आयव्हीएफ (IVF) फेल झाल्यानंतर आणि गर्भपाताचा दुःखद अनुभव घेतल्यानंतर, अभिनेत्री संभावना सेठ अखेर आई होणार आहे. तिने तिचा पती अविनाश द्विवेदीबरोबर मिळून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. सरोगसीच्या माध्यमातून त्यांच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे, असं या जोडप्याने सांगितलं.
संभावना सेठ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या आयुष्यातील खासगी गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. ती आणि तिचा पती त्यांच्या ‘व्लॉग’च्या माध्यमातून आयुष्यातील घडामोडी चाहत्यांना सांगत असतात. एका दिवसापूर्वीच त्यांनी एका व्लॉगमध्ये लवकरच ‘गुड न्यूज’ देणार असल्याचं सांगितलं होतं आणि आता अखेर चाहत्यांना हे गोड सरप्राईज दिलं आहे.
संभावना सेठच्या सोशल मीडिया पोस्टने वेधले लक्ष
या जोडप्याने सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत दोघांच्या हातात एक वर्तमानपत्र आहे, ज्यावर लिहिलंय, “सॅम व अवीचं बाळ लवकरच येत आहे, ब्रेकिंग न्यूज… आम्ही प्रेग्नंट आहोत.” दुसऱ्या फोटोत बाळाचे छोटे आणि गोंडस शूज दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत त्यांचा पाळीव श्वान दिसतोय. तिथे एक बोर्ड ठेवलाय. ज्यावर “इट्स ऑफिशियल” असं लिहिलं आहे.
आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये संभावना व अविनाशने लिहिलं, “आम्ही प्रेग्नंट आहोत. आमचा सर्वात सुंदर प्रवास आता ‘प्रॉडक्शन’मध्ये आहे. प्रेम, आशा आणि सरोगसीच्या सोबत… काउंटडाउन सुरू झाले आहे.”
गर्भपातानंतर खचली होती संभावना सेठ
गेल्या डिसेंबरमध्ये संभावना आणि अविनाश यांनी एक अत्यंत त्रासदायक खुलासा केला होता. अनेक वेळा आयव्हीएफसाठी प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले आणि तिचा गर्भपात झाला होता. त्या कठीण काळाबद्दल संभावनाने भावुक होत सांगितलं होतं.
अविनाशने सांगितलं होतं की, हा संघर्ष त्यांच्या आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू होता. गेल्या वर्षी जेव्हा संभावना गरोदर होती, तेव्हा त्यांचं बाळ निरोगी असेल अशी त्यांना आशा होती. ते चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगणारच होते, तितक्यात त्यांना समजलं की बाळाचा गर्भातच मृत्यू झाला आहे. त्या कठीण काळापासूनच तिचे चाहते ती लवकरच आई व्हावी, यासाठी प्रार्थना आणि आशीर्वाद देत होते.
आता संभावनाने ही ‘गुड न्यूज’ दिल्यानंतर चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनीही तिचे अभिनंदन केले आहे. भारती सिंह, गौहर खान, माही विज यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
