माजी अभिनेत्री सना खानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून, त्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये ती कबरची (सरण रचण्याची) तयारी करण्याविषयी बोलताना दिसत आहे. जगातील नातेसंबंध आणि मोह-माया यांपेक्षा प्रत्येकाने आपल्या अखेरच्या प्रवासाची म्हणजेच अंत्यसंस्काराची तयारी करावी, असं तिने म्हटलं आह

व्हिडीओमध्ये सना म्हणते की, हल्ली अनेक जण स्वार्थी असल्याचं पाहायला मिळतं. आजच्या काळात कोणीही कोणाची मनापासून आठवण काढत नाही किंवा काळजी घेत नाही. त्यामुळे लोकांकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी प्रत्येकाने स्वतःच्या हाताने त्यांचे सरण रचावे. सना खानच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी तिच्या विचारांचं समर्थन केलं आहे, तर काहींनी तिच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगते की, शेवटी आपली मुलं, नातेवाईक किंवा मित्र यांपैकी कोणीही आपल्या कामी येणार नाही. आपल्या निधनानंतर कोणी आपल्या वतीने दानधर्म करणार नाही आणि ना कोणी कुराणाचे पठण करून आपल्या कर्मांची माफी मिळवून देणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या कर्मांची जबाबदारी स्वीकारत आयुष्य जगावे आणि परलोकाची तयारी स्वतःच करावी.

सना नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओमध्ये सना खान म्हणाली, “तुम्हाला खरंच वाटतं का की, तुमच्या निधनानंतर तुमची मुलं, नातेवाईक, कुटुंबीय किंवा मित्र तुमच्यासाठी कुराणाचे पठण करून तुमच्या पापांची माफी मिळवून देतील? जी मुलं तुमच्या सांगण्यावरून नमाजही पठण करत नाहीत, ती तुमच्यासाठी कुराण वाचतील का? ज्या नातेवाईकांबरोबर तुमचे वादच संपत नाहीत, ते तुमच्यासाठी मनापासून दुआ (प्रार्थना) करतील का? आणि जे भाऊ-बहिण ईदच्या दिवशीसुद्धा तुमची आठवण काढत नाहीत, ते तुमच्या नावाने सदका (दानधर्म) करतील का?”

सना खान पुढे म्हणाली, “अरे भोळ्या माणसा, मनापासून नाती जपण्याचा काळ आता संपला आहे. कयामत (प्रलय) जवळ येत आहे. सर्वत्र गोंधळ आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. त्यामुळे आपल्या कबरची आणि परलोकाची तयारी स्वतःच करा. जिवंत असताना जे लोक एकमेकांची आठवण ठेवत नाहीत, ते मृत्यूनंतर आठवण काढतील? शेवटी प्रत्येकजण विसरून जातो. म्हणून आपल्या कबरची तयारी स्वतःच करा. आजपासूनच त्याची सुरुवात करा.”

२०२०मध्ये सोडली इंडस्ट्रीत

सना खानने २०२० मध्ये मनोरंजन विश्वातून कायमचा निरोप घेतला. याची घोषणा तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केली होती. त्यावेळी तिने सांगितलं होतं की, आता पुढे ती मानवतेची सेवा आणि अल्लाहने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेत आहे. याच वर्षी तिने गुजरातमधील उद्योजक आणि इस्लामिक विद्वान मुफ्ती अनस सैयद यांच्याशी निकाह केला. सना हिने यापूर्वी सांगितलं होतं की, हा निर्णय तिने एका रात्रीत घेतलेला नव्हता. अनस अनेक वर्षांपासून तिला पसंत करत होते. अखेर एका मौलवीमार्फत त्यांनी तिला लग्नाचा प्रस्ताव पाठवला आणि त्यानंतर दोघांचा निकाह झाला. सध्या सना खान स्वतःचं यूट्यूब चॅनल चालवते. ती दोन मुलांची आई असून, कुटुंबाबरोबरचं आयुष्य आणि धार्मिक विषयांवरील विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते.

दरम्यान, सना खानने सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात काम केलं होतं. यानतंर ‘वजह तुम हो’, ‘बिग बॉस’ आणि ‘खतरो के खिलाडी’ या कार्यक्रमात काम केलं आहे.