Sandipa Virk Tihar Jail Story : तुरुंगात गेल्यानंतर पहिल्याच दिवशी मी देवाकडे मृत्यूची प्रार्थना केली, असं म्हटलंय अभिनेत्री व इन्फ्लुएन्सर संदीपा विर्क हिनं. अभिनेत्री संदीपा जवळपास चार महिने तुरुंगात शिक्षा भोगत होती. अशातच आता तिनं तिच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाबद्दल भाष्य केलं आहे.
संदीपा विर्क हिनं चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. डिसेंबर २०२५ मध्ये अभिनेत्री चार महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर तिहार तुरुंगातून बाहेर आली. परंतु, संदीपा विर्क हिला शिक्षा का झाली होती आणि आयुष्यातील त्या कठीण काळाबद्दल अभिनेत्री काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
अभिनेत्रीने सांगितला तुरुंगातील अनुभव
सिमरन मकरसह संवाद साधताना संदीपानं याबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, “तिहार ही अशी जागा आहे, ज्याचा मी कधी माझ्या शत्रूसाठीसुद्धा विचार करणार नाही. जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेले तेव्हा मी देवाला म्हटलं की, मी असं काहीच केलेलं नाहीये की, मला हे अनुभववावं लागतंय. जेव्हा पहिल्यांदा मी तिथल्या वॉशरूममध्ये गेले तेव्हा मी विचार केला की, असं म्हणतात की सगळं काही कर्मांवर अवलंबून असतं. मीसुद्धा कदाचित कळत-नकळत पूर्वीच्या जन्मात काहीतरी पाप केलं असणार.”
तिहार तुरुंगातील वाईट अनुभव सांगताना संदीपा म्हणाली, “मी देवाकडे मला मृत्यू येऊ देत आणि माझी यातून सुटका होऊ देत, अशी प्रार्थना करत होते. त्यामध्ये सर्वांत त्रासदायक गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचे पालक तुम्हाला भेटण्यासाठी तुरुंगात येतात. मी माझ्या पालकांची त्यांना अशा ठिकाणी यावं लागलं यासाठी माफी मागितली; पण माझ्या पालकांनी आणि माझ्या भावंडांनी मला खंबीर साथ दिली. कारण- फक्त तुमच्या जवळच्या माणसांनाच माहीत असतं की, तुम्ही कसे आहात. तिहार तुरुंगात राहणं खूप कठीण आहे. ५०० लोकांबरोबर एकत्र राहताना मला खूप त्रास झाला. मी इतकी खचले होते की, मला साधं उठताही येत नव्हतं. जेव्हा आज मी त्या गोष्टीचा विचार करते तेव्हा मला अक्षरशः रडू येतं.”
तिहार तुरुंगातील दैनंदिन जीवनशैलीबद्दल संदीपा म्हणाली, “तेथील प्रसाधनगृह खूप अस्वच्छ आहे. तुम्हाला जमिनीवर झोपावं लागतं. दररोज तीच डाळ, तीच भाजी आणि चार चपात्या, असं जेवण असतं. तुम्हाला जेवावंसंही वाटत नाही.” आपल्यावर झालेल्या आरोपांंबद्दल बोलताना संदीपा म्हणाली, “जेव्हा माझी बातमी बाहेर आली तेव्हा सर्व जण मला फ्रॉड म्हणत होते. खून करणाऱ्या माणसालाही इतकी वाईट वागणूक मिळत नाही; पण मी तर काहीही केलं नसताना माझ्याबरोबर इतकं काही घडलं.”
नेमकं प्रकरण काय आहे?
दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार संदीपाचं नाव इन्व्हेस्टमेंट स्कॅममध्ये आलं होतं. तिनं सहा कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी तिला शिक्षा झाल्याचं म्हटलं जातं. परंतु, २७ डिसेंबर २०२५ मध्ये कोर्टानं तिला जामीन दिला. कारण- मुख्य आरोपी अजूनही फरारी होता.
