माणसाच्या आयुष्यात अनेकदा काही अतर्क्य गोष्टींना त्याला सामोरं जावं लागतं. त्यातल्या काहींवर कधीच उत्तरं सापडत नाहीत. व्यावहारिक आणि कायदेशीर दृष्टीनंही! अशाच एका गहन प्रश्नानं एका जोडप्याच्या (खरं तर त्यातल्या स्त्रीच्या!) आयुष्यात घडवलेली प्रचंंड उलथापालथ नाटकरूपात आपल्यासमोर आणण्यात आली आहे… ‘सांगा, कसं जगायचं?’
अंजली आणि अक्षय या जोडप्याला लग्नाला काही वर्षं उलटूनही मूल होऊ शकलेलं नाही. त्यांचे सर्व प्रयत्न आजवर फोल ठरलेत. शेेवटचा पर्याय म्हणून आयव्हीएफ तंत्रज्ञानाने मूल होऊ द्यावं या निर्णयाप्रत ते आलेत. दत्तक मूल हा एक पर्याय आहे खरा, परंतु तो अगदी शेवटचा म्हणूनच अवलंबायचा असं त्यांनी ठरवलंय. कारण अक्षय अनाथाश्रमात लहानाचा मोठा झालाय. त्यामुळे त्याचे असे कुणीच जवळचे नातलग त्याला नाहीएत. म्हणूनच आपल्यानंतर आपल्या रक्तामांंसाचा एखादा तरी अंश या पृथ्वीतलावर अस्तित्वात राहावा अशी त्याची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे आयव्हीएफ तंत्रानं आपलं मूल जन्माला घालावं, या पर्यायापाशी ते आले आहेत. त्याबद्दलची पूर्वतयारीही त्यांनी केलीय.
आणि अचानक अक्षय एका अपघातात कोमात जातो. अंजली या अकस्मात कोसळलेल्या संकटानं समूळ हादरते. कारण अक्षयसारख्या अनाथ मुलाशी लग्न केल्यानं तिची माहेरची माणसंही तिला दुरावलीयत. त्यामुळे तीही एकटीच या संकटाला सामोरी जातेय. आणि अक्षय कोमातून बाहेर येणार की नाही, आलाच तर कधीपर्यंत येईल, या प्रश्नाचं निश्चित, खात्रीशीर उत्तर डॉक्टरही देऊ शकत नाहीत.
अंजलीने सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टने ॲड. स्नेहा पाटील ही तिची चौकशी करत हॉस्पिटलमध्ये येते. ती अक्षयच्या अपघाताची केस लढवण्याची तयारी अंजलीपाशी दर्शवते. याचं कारण संबंधित मोटारचालक अपघातानंतर पळून गेलेला असतो. तो एका श्रीमंत बापाचा बेटा असतो. त्यामुळे त्याला पकडणं व्यवस्थेच्या दबावामुळे पोलिसांना शक्य होत नाही. यासाठी आपण आपली सर्व ताकद पणाला लावून त्याला शिक्षा मिळेल असं पाहू असं स्नेहा अंजलीला सांगते. पण अंजलीला खरं तर एक वेगळाच प्रश्न भेडसावतो आहे. या अवस्थेत अक्षयचे शुक्राणू (स्पर्म) काढून घेऊन आपण गर्भवती राहू शकतो का, असं ती स्नेहाला विचारते. स्नेहाला हा धक्काच असतो. असं काहीही करणं कायद्याने शक्य नाही, अक्षयच्या प्रत्यक्ष परवानगीविना ते बेकायदेशीर ठरेल, आणि अक्षयच्या या अवस्थेत ते शक्यच नाहीए ही गोष्ट स्नेहा तिच्या निदर्शनास आणते. पण अक्षयचीच ती इच्छा होती हे अंजली परोपरीनं तिला सांगायचा प्रयत्न करते. मात्र, स्नेहाला ते कायदेशीररीत्या कोर्ट मान्य करणार नाही हे माहीत असतं. ती अंजलीला हे पटवायचा प्रयत्न करते. मात्र तिला ते बिलकूल पटत नाही. आम्हा दोघांची ही इच्छा होती आणि ती पूर्ण करण्याचा आम्हाला अधिकार आहे असं अंजलीचं म्हणणं. त्यानुसार नाइलाजानं स्नेहा कोर्टात अर्ज करते. पण तो फेटाळला जातो. दोघीही हतबल होतात.
अशात अचानक अक्षय जातो. त्याने अंजली अक्षरश: कोलमडून पडते. पण ती त्याची अखेरची इच्छा काहीही झालं तरी पूर्ण करायचीच असा निश्चय करते… जरी कोर्टाला ते मान्य नसलं, तरीही! अर्थात बेकायदेशीरपणे! त्यासाठी सर्व प्रकारचा लढा द्यायला ती तयार असते… मानवी अधिकारासाठीचा लढा! स्नेहाही मग तिच्या या लढ्यात सामील होते. ती अपघात करणार्या तरुणावरही कायद्याचा बडगा उगारते. आपले सगळे कॉन्टॅक्टस् वापरून ती त्याला कोर्टात खेचते. दुसरीकडे अंजलीच्या इच्छेच्या तीव्रतेपुढे, त्यातील सच्चाई मनोमन पटून ती अखेर मान तुकवते.
अक्षयचे शुक्राणू काढून घेऊन अंजली आयव्हीएफ तंत्रानं गर्भवती राहते. आणि स्नेहाच्या आग्रहाखातर नोकरी सोडून देऊन ती तिच्या घरीच राहायला येते. त्यामुळे समाजाच्या अनाठायी प्रश्नांना उत्तरं देण्याची वेळ तिच्यावर येत नाही. आणि हे सगळं गुपचूप केल्यानं कायद्याच्या कचाट्यातही ती सापडत नाही.
…आणि अचानक एके दिवशी रोकडे नावाचा एक इसम तिनं कोर्ट केसमधून माघार घेऊन अपघात केलेल्या तरुणाला कायद्याच्या कचाट्यातून सोडवावं म्हणून अंजलीकडे प्रस्ताव घेऊन येतो. तिने तिला पाहिजे ती रक्कम सांगावी, ती तिला त्या तरुणाचे वडील द्यायला तयार आहेत, त्या बदल्यात तिनं ती केस मागे घ्यावी असं तो सुचवतो. अन्यथा तिनं बेकायदेशीररीत्या तिच्या नवर्याचे शुक्राणू काढून घेऊन ती गर्भवती राहिली आहे हे उघड केलं जाईल आणि तिला अटक होईल अशी धमकीही रोकडे देतो. अंजली त्याचा हा प्रस्ताव फेटाळूून लावते. अर्थात ती याबद्दल जनतेच्या कोर्टात जायचं ठरवते. स्नेहा सोशल मीडियावर अंजलीची जेन्युइन केस मांडते आणि लोकांचा त्यास भरभरून सकारात्मक प्रतिसाद मिळतो. अंजली स्वत: होऊन कोर्टात आपली केस दाखल करते आणि आपण केलेला गुन्हाही कबूल करते. त्याचबरोबर आपल्या मानवी अधिकारांचा मुद्दाही कोर्टासमोर ठासून मांडते. अर्थात त्याचं पुढे काय होतं, किंवा होईल, हे संदिग्धच राहत असलं तरी एका जोडप्याच्या जेन्युईन मानवी अधिकाराबद्दल समाजात किमान विचारमंथन तरी व्हावं… या नोटवर नाटक संपतं.
सध्या मराठी रंगभूमीवर नवरा-बायकोच्या नात्यावरील नाटकांचा अजीर्ण व्हावा इतका सुकाळू झालाय. या पार्श्वभूमीवर एखाद्या वेगळ्या, खर्याखुर्या या विषयावरील गंभीर नाटकाची प्रेक्षक चातकासारखी वाट पाहत होते. ती भूक ‘सांगा, कसं जगायचं?’ने पूर्ण केली आहे. डॉ. सत्यजित खारकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असं हे नाटक लिहिलं आहे. अस्सल जीवनानुभव देणारं हे नाटक रसिकांनी चुकवता कामा नये असंच. नीरज शिरवईकर यांनी त्याची रंगावृत्ती आणि दिग्दर्शन सिद्ध केलं आहे. त्यांंनी पहिला अंक तर इतका घट्ट बांधला आहे की प्रेक्षक क्षणभरही जागेवरून हलणार नाही. त्यामुळे दुसर्या अंकाबद्दलचं कुतूहलही शिगेला पोहोचतं. शिवाय या विषयात अनेक कायदेशीर, नैतिक आणि मानवीय बाबीही समाविष्ट असल्याने नाटक कसं वळण घेणार याबद्दलही जबरदस्त उत्सुकता होती. आणि अपेक्षित वळणांनी ते कुतूहल शमवलं गेल्यानं सुटकेचा एक सुस्कारा आपोआपच टाकला जातो. नीरज शिरवईकरांनी नाटकाच्या विषयाला पुरेपूर न्याय दिला आहे. दुसर्या अंकात आधीचा परिणाम किंचित पातळ झाला असला तरी मूळ विषयच इतका ज्वालाग्राही असल्याने ते प्रेक्षकांकडून तितकंसं मनावर घेतलं जात नाही. आणि शेवटाला उत्कर्षबिंदूशी नाटक पुन्हा एकदा जबरदस्त उसळतं. नाटकाचा हा आलेख दिग्दर्शकानं नेमकेपणानं हेरला आहे. घटना-प्रसंगांची मांडणी, पात्रांचे व्यवहार, त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष आणि विषयाचं गांभीर्य यांचा एकमेळ नाटकात घातला गेला आहे. त्यामुळेच नाटक एका अपेक्षित उंचीवर गेलं आहे. हे करत असताना वास्तवतेची कास कुठंही सुटू दिली गेलेली नाही. म्हणूनच उथळ सवंगतेपासून नाटक चार पावलं दूरच राहतं. याचं श्रेय दिग्दर्शकाला जातं. इतकं बांधीव, गोळीबंद, आशयसंपन्न नाटक इतक्यात तरी पाहायला मिळालेलं नाही. हा विषय तर मराठी रंगभूमीवर अस्पर्शितच आहे. त्याबद्दल समाजात विचारमंथन होणं जरूरीचं आहे. आणि त्यानुसार कायद्याचं अपेक्षित अधिष्ठान त्याला प्राप्त होणं ही काळाची निकड आहे, ही गोष्ट ‘सांगा, कसं जगायचं?’नं ऐरणीवर आणली आहे.
नेेपथ्यकार संदेश बेन्द्रे यांनी हॉस्पिटल, कोर्ट आणि स्नेहाचं घर अशी तिन्ही नाट्यस्थळं वास्तवदर्शी साकारली आहेत. श्याम चव्हाण यांनी यातले नाट्यपूर्ण प्रसंग प्रकाशयोजनेतून ठळक, ठाशीव केले आहेत. विजय गवंडे यांनी संगीतातून त्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती केली आहे. श्वेता बापट यांची वेशभूषा आणि सचिन वारीक यांची रंगभूषा नाटकाची मागणी पुरवणारी.
यातील सर्वच कलाकारांची चोख कामं नाटकाची उंची वाढवणारी ठरली आहेत. विशेषत: स्पृहा जोशी आणि स्वानंदी टिकेकर यांनी हे नाटक अक्षरश: तोलून धरलं आहे. स्पृहानं साकारलेली अंजली खरीखुरी, हाडामांसाची वाटते. तिचं दु:ख, तिची व्यथा-वेदना, तिचा मनोकायिक संघर्ष सच्चा वाटतो. त्यात कणभरही कमअस्सल काही आढळत नाही. तिचं शेवटचं स्वगत तर इतकं टिपेला पोहचतं, की प्रेक्षकांचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. स्वानंदी टिकेकर यांची ॲड. स्नेहा पाटील तितकीच अस्सल. तिची व्यावसायिक बांधीलकी, तरीही क्लाएंटची कायद्याने चुकीची, परंतु मानवीयदृष्ट्या बरोबर असलेली बाजू समजून घेण्यातली निखळ माणुसकी, त्यासाठी काही क्षण प्रोफेशनल एथिक्स बाजूला ठेवून तिनं अंजलीच्या पाठीशी उभं राहणं, त्याकरता आकाश-पाताळ एक करणं… ही सारी भावावस्थांतरं त्यांनी उत्कटतेनं दाखवली आहेत. त्यांची विशिष्ट शब्दफेक त्यांना याकामी उपयोगी पडली आहे. आज वकिली पेशातली हरवलेली माणुसकी त्यांच्या भूमिकेतून प्रत्ययाला येते. अमेय बर्वे यांचा डॉ. मंदार भागवत हाही असाच लक्षवेधी. श्रद्धा पोखरणकर यांची बडबडी नर्स- श्रीमती कुलकर्णी आपल्या वागण्या-वावरण्यातून भाव खाऊन जाते. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ही सिस्टर सहजी सापडू शकते. निषाद भोईर यांनी अनाथ अक्षयची अस्वस्थ मानसिकता यथार्थपणे व्यक्त केली आहे. स्वत:चं मूल असण्याची त्याची असोशी म्हणूनच समर्थनीय ठरते. सागर आठलेकर यांचा मानभावी गुंड रोकडे अस्सल. त्याची भाषा, त्यातली साखरपेरणी आणि आपल्या मनाविरुद्ध काही झालं की मूळ स्वभावावर उतरणं… लाजवाब.
एकुणात, अगदी कुणीही चुकवू नये असंच हे नाटक… ‘सांगा, कसं जगायचं?’
