scorecardresearch

कुमार सोहोनी आणि प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

ज्येष्ठ नाटय़-चित्रपट दिग्दर्शक कुमार सोहोनी आणि अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कुमार सोहोनी आणि प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार
कुमार सोहोनी आणि प्रशांत दामले

ज्येष्ठ नाटय़-चित्रपट दिग्दर्शक कुमार सोहोनी आणि अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कुमार सोहोनी यांनी आजवर शंभरावर नाटके तसेच चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत. तर प्रशांत दामले यांनी चाळीस वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ नाटय़कारकिर्दीत १२,५०० हून अधिक नाटय़प्रयोगांचा विक्रम नुकताच केला आहे.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे स्नातक असलेले कुमार सोहोनी यांनी ‘अग्निपंख’, ‘अथ मानुस जगन हं’, ‘कुणीतरी आहे तिथे’, ‘रातराणी’, ‘देहभान’, ‘वासूची सासू’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’ अशी वेगवेगळय़ा पिंडप्रकृतीची ७० हून अधिक नाटके हौशी, प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शित केलेली आहेत. तर ‘एक रात्र मंतरलेली’, वहिनीची माया’, ‘कमाल माझ्या बायकोची’ आदी १७ चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. याव्यतिरिक्त टेलिफिल्म्स तसेच अनेक हिंदी-मराठी मालिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.

‘टुरटूर’पासून सुरू झालेला अभिनेते प्रशांत दामले यांचा नाटय़प्रवास ‘मोरूची मावशी’, ‘ब्रह्मचारी’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘बहुरूपी’, ‘सं. संशयकल्लोळ’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘सारखं काहीतरी होतंय’, ‘साखर खाल्लेला माणूस’ अशा वैविध्यपूर्ण नाटकांतून अजूनही त्याच जोमाने सुरू आहे. वर्षांला साधारणत: तीनशे प्रयोग इतक्या प्रचंड संख्येने प्रयोग करणारे भारतीय रंगभूमीवरील ते बहुधा एकमेव कलावंत असावेत. या दोन समर्पित रंगकर्मीची दखल संगीत नाटक अकादमीच्या राष्ट्रीय सन्मानाद्वारे घेतली गेल्याबद्दल नाटय़वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या