Sania Mirza Dubai House Tour Salman Khan Painting: टेनिसपटू सानिया मिर्झा ही घटस्फोटानंतर तिचा मुलगा इझहानबरोबर दुबईतील आलिशान घरामध्ये राहते. अर्चना पूरन सिंहने नुकतीच सानियाच्या आलिशान घराची झलक दाखवली आहे. विशेष म्हणजे तिच्या घरामध्ये सलमान खानने रेखाटलेली सुंदर चित्रं लावण्यात आली आहेत.

अर्चना पूरन सिंहने सानिया मिर्झाच्या दुबईतील कोट्यवधी रुपये किमतीच्या आलिशान घराची टूर केली. यावेळी सानियाच्या घरातील आकर्षक सजावट, शाही थाट आणि सुंदर फर्निचर पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे, तिच्या या घराचं संपूर्ण इंटिरिअर सानियाने स्वतः केलं आहे. तसेच टेनिसमध्ये यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या सानिया मिर्झाच्या किचनमध्ये चक्क टेबल टेनिस असल्याचे दिसून आले आहे.

आकर्षक गालिचे अन् उर्दू भाषेतील फ्रेम्स

सानियाच्या घराची सजावट अगदी राजेशाही पद्धतीने करण्यात आली आहे. तिच्या घरात सोनेरी, पांढरा, ऑफ-व्हाइट, पीच आणि रॉयल ब्लू रंगांचा वापर करण्यात आला आहे. जुन्या काळातील कलाकृती आणि वस्तूंपासून प्रेरणा घेत घराची सजावट करण्यात आली आहे. घराच्या मध्यभागी भलंमोठं झुंबर असून, काही भिंतींवर सोनेरी पंखांच्या डिझाइन असलेल्या फ्रेम्स लावलेल्या आहेत. आकर्षक गालिचे, उर्दू भाषेतील काही फ्रेम्स आणि मेणबत्त्यांनी सानियाच्या घरात प्रसन्नमय वातावरण असल्याचे दिसून आले.

    कसं आहे सानिया मिर्झाचं घर?

    सानिया मिर्झाच्या घरामध्ये दोन प्रकारच्या लिव्हिंग रूम आहेत. एकामध्ये तिची औपचारिक बैठक होते, तर दुसऱ्या लिव्हिंग रूममध्ये ती तिच्या जवळच्या व्यक्तींबरोबर वेळ घालवत असल्याचे सानियाने सांगितले. या खोलीत सानिया आणि तिचा मुलगा इझहान यांची चाहत्यांनी काढलेली अनेक चित्रं आणि पेंटिंग्सही लावण्यात आली आहेत. ती म्हणाली, “इथेच सगळा धमाल-मस्तीचा माहोल असतो. मी फार औपचारिक व्यक्ती नाही. कॅमेरा नसता तर मी तुम्हाला थेट या अनौपचारिक लिव्हिंग रूममध्ये घेऊन आले असते. आम्ही इथं टीव्हीवरील कार्यक्रम व क्रिकेटचे सामने पाहतो आणि निवांत वेळ घालवतो.”

    सानियाच्या घरातील आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे तिचं किचन. या किचनचा वापर स्वयंपाकासाठी केला जात नसल्याचा खुलासा तिने स्वतः केला आहे. किचनच्या या जागेचा वापर मनोरंजनासाठी केला जात असून तिथे चक्क टेबल टेनिसचे टेबल ठेवण्यात आलं आहे. सानिया म्हणाली, “हे तर फक्त शो किचन आहे, आम्ही इथे फक्त कॉफी बनवतो.”

    सानिया मिर्झाच्या घरात सलमान खानच्या पेंटिंग्स

    सानिया मिर्झाच्या घरातील जिन्यांवर काही खास पेंटिंग्स लक्ष वेधून घेतात. एका भिंतीवर नमाज अदा करणाऱ्या व्यक्तीची चित्रं लावण्यात आली आहेत.
    या एकूण ११ फ्रेम्स असून विविध माणसांचे चेहरे आणि नमाज अदा करताना व्यक्ती दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, या सर्व पेटिंग्स सलमान खानने स्वतः रेखाटल्या असून त्याने सानिया मिर्झाला गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. याबाबत सानिया म्हणाली, “ही चित्रं मला सलमान खाननं भेट म्हणून दिली आहेत.”